
‘या’ दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले…
मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा २ सप्टेंबर रोजीचा जी. आर. चॅलेंज करण्याचे त्यांनी ठरवले आहे, तर आम्हीदेखील सन १९९४चा जी. आर. रद्द करण्याची मागणी करू, तेव्हा पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्या आहेत, त्यादेखील बाहेर काढा, अशी मागणी करू, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १९९४ मधील या जीआरनुसार धनगर आणि वंजारी जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आले होते. जरांगे यांनी वंजारी समाजाला दिलेले दोन टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘बोगस जाती’ आणि ‘प्रगत जाती’ यांनाही आरक्षणातून बाहेर काढण्याची मागणी करणार असल्याचे जरांगे म्हणाले.
अखेर तायवाडेंना वगळले, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपसमितीसह ओबीसी नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी बोलाविलेली ओबीसी नेत्यांची बैठक अखेर दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना निमंत्रित केल्यावरून सकल ओबीसी महामोर्चासह ओबीसी नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती.
शेवटी तायवाडे यांना बैठकीतून वगळल्यानंतर सकल ओबीसी महामोर्चासह ओबीसी नेत्यांनी बैठकीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह समितीचे सदस्य, भाजपचे आ. डॉ. परिणय फुके उपस्थित राहणार आहेत.