
‘मविआ’ ही शाबूत राहणार ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत.
रविवारीच दोन्ही बंधूंमध्ये मातोश्रीमध्ये राजकीय चर्चा झाली. प्रामुख्याने मुंबईसह राज्यातील पाच महापालिकांमध्ये दोन्ही पक्षांची युती करण्याबाबत एकमत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे.
उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. नेमक्या कोणत्या महापालिकांमध्ये युती होऊ शकते, या प्रश्नावर राऊतांनी पाच महापालिकांच्या नावांचा उल्लेख केला. अर्थातच त्यामध्ये मुंबई महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे. यांसह ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महापालिकांबाबत ठाकरे बंधूंमध्ये एकमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच प्रमुख महापालिकांमध्ये आपल्याला काम करावेच लागेल, याबाबत एकमत आहेत. याशिवाय अशा अनेक महापालिका आहेत, जिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागात मनसे आहे. त्यांची कुठे मदत घेता येईल? काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे. विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. या सगळ्याचा विचार पुढील निवडणुकांमध्ये करावा लागेल, असे सांगत राऊतांनी महाविकास आघाडी शाबूत राहणार असल्याचेही संकेत दिले आहेत.
मनसे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणार का, याबाबत उत्तर देताना राऊतांनी या प्रश्नाचे उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच देऊ शकतील, असे सांगितले. तसेच महाविकास आघाडी विधानसभेसाठी तयार झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळे गणित निर्माण करू. त्यात कोण कुठे असेल, याच अभ्यास करू, असे सांगत राऊतांनी काही महापालिकांमध्ये मविआ एकत्रित राहणार असल्याचे संकेत दिले.
महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. मनसे हा स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. तो स्वतंत्रपणे निवडणुका लढतो. सध्या आमची मनसेसोबत चर्चा सुरू आहे, असे सांगण्यासही राऊत विसरले नाहीत. मराठी अस्मितेसाठी लढणारे हे दोन पक्ष आहे. त्यामुळे मुंबईत महापौर ठाकरे बंधूंचाच होईल. ही युती ‘दिल और दिमाग से’ बनी युती आहे. ही केवळ राजकीय युती नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले.