
आता पुढचा क्रमांक…
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला होता. या संतापजनक घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. सरन्यायाधीशांच्या कुटुंबीयांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही संताप व्यक्त केला असून सावधही केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियात बूटफेक प्रकरणावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, गावांमध्ये जातीय व्यवस्थेला खुलेआमपणे आणि हिंसक पध्दतीने समर्थन केले जातेय. गावांमधील जातीवर आधारित अत्याचाराकडे केवळ क्रुर वास्तविकता म्हणून पाहिजे जात होते.
शहरांमध्ये जातीभेदाने मुक-मुखवटा घातलेला आहे. कार्यालये, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांच्या चार भिंतींच्या आत दडलेला आहे. पण आता असे राहिलेले नाही. सरन्यायाधीश गवई यांच्यावर नुकताच झालेला हल्ला हे जातीय घृणा आता चार भिंतींच्या बाहेर आल्याचे कडवट सत्य आहे, अशी नाराजी आंबेडकरांनी व्यक्त केली.
जेव्हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीलाही जातीच्या आधारावर निशाणा बनविले जाऊ शकते, तर मग दलित आयएएस अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी याचा काय अर्थ आहे? आता पुढचा क्रमांक आयएएस अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांचा असू शकतो, असे सांगत आंबेडकरांनी सावधही केले आहे. ही घटना म्हणजे केवळ एक घटना नाही तर एक संदेश आहे, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.
काय घडलं होतं?
सरन्यायाधीश गवई यांच्या कोर्टामध्ये कामकाज सुरू असताना अचानक वकील राकेश किशोर याने त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वकिलाला तातडीने सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कोणतीही तक्रार न आल्याने पोलिसाने त्याला सोडून दिले. अशा घटनांनी मी प्रभावित होत नाही, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीशांनी कोर्टातच सर्वांसमोर व्यक्त केली होती.
राकेश किशोर याने मात्र मीडियाशी बोलताना या कृत्याचा पश्चाताप नसल्याचे म्हटले होते. परमात्म्यानेच माझ्याकडून हे कृत्य करवून घेतल्याचे धक्कादायक विधान त्याने केल होते. पुन्हा असे करू शकतो, असा धमकीवजा इशाराही वकिलाने दिला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.