
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात मोदी यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी मुंबई, महाराष्ट्राचा विकास तसेच विकसित भारताची संकल्पना यावरही भाषण केले.
नवी मुंबई येथील विमानतळाला आता दि बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र या नामकरणासाठी स्थानिकांना मोठा संघर्ष करावा लागला. मोदी यांनी आपल्या भाषणात दि बा पाटील यांचेही नाव घेतले आहे.
नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले?
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मराठीतून भाषण केले. विजयादशमी झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली. आता दहा दिवसाने दिवाळी. तुम्हाला या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, अशे उद्गार मोदी यांनी मराठीत केले. पुढे बोलताना आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट या क्षेत्राला आशियातील सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी ठरेल. मुंबईला आज अंडरग्राऊंड मेट्रो मिळाली. त्यामुळे मुंबईचा प्रवास सोपा होईल. विकसित भारताचं हे जिवंत प्रतिक आहे. मुंबईसारख्या वर्दळीच्या शहरात आणि ऐतिहासिक इमारतींच्या शहरात ही शानदार मेट्रो जमिनीतून तयार केली आहे. त्यासाठी मी काम करणारे कामगार आणि इंजिनियर यांचं अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले.
६० हजार कोटींची पीएम स्किम लॉन्च झाली
तसेच, हा काळ तरुणांसाठी संधीचा काळ आहे. काही दिवसांपूर्वी देशातील अनेक आयटी इंडस्ट्रीला जोडण्यासाठी ६० हजार कोटींची पीएम स्किम लॉन्च झाली आहे. आजपासून महाराष्ट्र सरकारने आयटीआय मध्ये कार्यक्रम सुरू केले आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांनाही ड्रोन, रोबोटिक्स, ग्रीन हायड्रोजन अशा अनेक टेक्निकची ट्रेनिंग मिळत आहे, असेही मोदी म्हणाले.
दि बा पाटील यांचे घेतले नाव
पुढे बोलताना त्यांनी दि बा पाटील यांच्यावरही भाष्य केले. आज मला महाराष्ट्राचे सुपुत्र, दिग्गज नेते दि. बा पाटील यांचीही आठवण येते. त्यांनी सेवाभावाने काम केलं. त्यांचं कार्य प्रेरणादायी. आमच्यासाठी ही प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाज सेवा करणाऱ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी म्हणाले. आज देश विकसित भारतासाठी एकजूट झाला आहे. विकसित भारत म्हणजे गतीही असेल आणि प्रगतीही असेल. जर तुम्ही गेल्या ११ वर्षाच्या प्रवासाकडे पाहिलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात या भावनेनेच वेगाने काम होत आहे. जेव्हा वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन धावते, बुलेट ट्रेनचं काम वेगाने होते. मोठे हायवे नव्या शहरांना जोडतात, जेव्हा डोंगर कापून मोठे टनेल तयार होतात तेव्हा भारताची गतीही दिसते आणि भारताची प्रगतीही दिसते. तेव्हा भारताच्या तरुणांच्या उड्डाणाला नवीन पंख लागतात, असे मत मोदी यांनी व्यक्तक केले. आजचा कार्यक्रमही हा सिलसिला पुढे नेत आहे. नवी मुंबई प्रकल्प असा प्रकल्प आहे, जो विकसित भारताचा आहे. या विमानतळाचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे. संस्कृतीचं हे जिवंत प्रतिक आहे, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.