
आई-वडिलांचा आक्रोश !
पालघर : विरारमध्ये 6 ऑक्टोबर रोजी दोन तरुणांनी एका इमारतीवरुन उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरु आहे.
अशातच आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथे घडली आहे. देविदास परशुराम नावळे आणि मनोज सिताराम वड अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रम शाळेत आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या इयत्ता दहावीत शिकणारा देविदास परशुराम नावळे (रा. बिवळपाडा, मोखाडा) आणि इयत्ता नववीमध्ये शिकणारा मनोज सिताराम वड (रा. दापटी, मोखाडा) या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. आश्रमशाळा परिसरात असलेल्या एका झाडाला कपडे सुकत घालण्यासाठी असलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आश्रमशाळा परिसरात आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या केलेल्या दोनही विद्यार्थ्यांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी देखील घटनास्थळाला भेट देत पाहणी केली व संपूर्ण घटनेबाबतची माहिती घेतली आहे. दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत.
इमारतीच्या 12 व्या मजल्यावर गेले अन्…
दरम्यान, विरारमध्ये काल अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. विरारमध्ये एका निर्माणाधीन इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारत दोन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली. ही धक्कादायक घटना विरार परिसरात घडल्याची माहिती आहे. श्याम सनद घोरई (वय वर्ष 20) आणि आदित्य रामसिंग (वय वर्ष 21) अशी आपले आयुष्य संपवलेल्या दोन्ही तरुणांची नावं असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास विरार पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरत एकच खळबळ उडाली आहे.