
अजित पवार म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
मात्र, या उद्घाटनावेळी माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न केल्याने पुन्हा एकदा भूमिपुत्र आणि सरकारमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याची घोषणा झाल्यापासून नवी मुंबई, पनवेलसह आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांनी सातत्याने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकारने अद्याप ही मागणी पूर्ण केलेली नाही
विमानतळाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात दिबांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबांच्या स्मृतींना उजाळा दिला. याव्यतिरिक्त कुठलीही घोषणा झाली नाही. त्यामुळे स्थानिकांनी पुन्हा एकदा सरकारला त्यांच्या मागणीची आठवण करून दिली आहे.
विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देणार?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आता भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी वार्ताहरांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देणार की हे नाव बदलणार? त्यावर अजित पवार म्हणाले, “अजून या विमानतळावरून उड्डाणं सुरू झालेली नाहीत. थोडं थांबा, यावर सरकार लोकमताचा विचार करून निर्णय घेईल.”
नवी मुंबई विमानतळाला नरेंद्र मोदींचं नाव देण्याची शिफारस?
भारतीय जनता पार्टी या विमानतळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा विचार करत असल्याची टीका देखील होत आहे. शिवसेनेचे (खासदार) संजय राऊत यांनी दावा केला आहे की “उद्योगपती गौतम अदाणी (ज्यांच्या अदाणी समुहाने हे विमानतळ बांधलं आहे) यांनी या विमानतळाला नरेंद्र मोदी यांचं नाव देण्याची शिफारस केली आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, “आधी विमानतळ चालू होऊ द्या. तिथून विमानांच्या उड्डाणास अद्याप ४५ दिवस बाकी आहेत. मान्यवरांनी तारीख दिली, उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी गतीने व्हायला मदत होते. मुंबई विमानतळावरील ताण खूप वाढला आहे. तो ताण कमी करण्यासाठी आपण हे विमानतळ बांधलं आहे.”
“केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. नायडू यांच्यासमोर आम्ही वाढवण येथील विमानतळाचा उल्लेख केला. त्याचंही काम लवकर सुरू होईल. वाढवण बंदर बांधायला चार-पाच वर्षे लागतील, तिथलं विमानतळ बांधायला देखील चार-पाच वर्षे लागतील. मुंबईसारखंच एक शहर तिथे उभं करायचं आहे. तिथे राहणाऱ्या नागरिकांना जगात, देशात व राज्याच्या कानाकोपऱ्यात संपर्क साधणं सोपं झालं पाहिजे. नवी मुंबई विमानतळावरून दरवर्षी नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील.
नवी मुंबईकरांच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
तसेच विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले, लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकार योग्य ती कार्यवाही करेल. जनतेचा विचार करून, बहुमताचा विचार करून सरकार निर्णय घेत असतं.