
भाजपच्या मामा राजवाडेंची 15 तास कसून चौकशी !
नाशिक शहरात बोकाळलेल्या गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी नाशिक पोलिस सध्या अॅक्शन मोडवर आली आहे. पोलिसांनी एकदम धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. स्वत: पोलिस आयुक्त काल रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.
गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेले राजकीय नेते, पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिकमध्ये दाखल होण्याआधीच पोलिसांनी मोठी अॅक्शन घेतली आहे. नुकताच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना गंगापूर रोडवरील विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित म्हणून अटक केली. याप्रकरणात नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
सचिन अरुण साळुंके (वय २८, रा. राणेनगर) याच्यावर गेल्या २९ सप्टेंबरला पहाटे विसे मळा येथे गोळी झाडली होती, त्यानंतर त्याचे अपहरण करीत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी सुनिल बागूल यांच्या दोन पुतण्यांना व त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. या गोळीबारातील मुख्य सूत्रधार असलेला अजय बागूल मात्र फरार आहे. अजय बागूलसह तुकाराम चोथवे, अजय बोरिसा यांच्यासह आठ ते दहा संशयित फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. अजय बागूल या प्रकरणाचा सूत्रधार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर अजय बागूलच्या बचावासाठी सुनील बागूल हे मुंबईत ठाणू मांडून आहेत.
सुनिल बागूल यांचा निकटवर्तीय असलेला व भाजवासी झालेला मामा राजवाडे याला गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं. विसे मळा गोळीबार प्रकरणात त्याचा सहभाग असल्याच्या संशयातून तब्बल पंधरा तास कसून चौकशी पोलिसांनी केली. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वीच राजवाडेंना पोलिसांनी गुन्हे शाखेत बोलावून 15 तास तपासणीसाठी बसवले होते. रात्री उशिरापर्यंतही त्यांना घरी सोडण्यात आले नव्हते. गुन्हेगारी कारवायांपासून बचावासाठीच राजवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चा प्रवेशावेळी रंगल्या होत्या.
दरम्यान आगामी महापालिका निवडणुक तोंडावर असताना भाजपचे नगसेवक, पदाधिकारी, नेते गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले. भाजपने महापालिका निवडणुक जिंकण्याच्या उद्देशाने अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना प्रवेश दिला. त्या लोकांमुळे आता भाजपचीच प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. भाजपमुळेच शहरात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधक करत आहेत.