
काँग्रेसच्या बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडून इतर राजकीय पक्षांना एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. अशामध्ये पुण्यात भाजपची ताकद वाढत चालली आहे.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. पुण्यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचसोबत अनेक पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा लवकरच पार पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात भाजपमध्ये मोठं इनकमिंग सुरू आहे. आजी -माजी नगरसेवक तसेच विविध पक्षातील मुख्य पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेगा पक्षप्रवेश सोहळा होणार संपन्न होणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती यशस्वी होणार असल्याची चर्चा होत आहे. येत्या काही दिवसांत या मेगा प्रवेश सोहळ्याचे आयोजन केलं जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्ट्राँग उमेदवार असेल तर त्याला पक्ष प्रवेश दिला जाणार असे सुतोवाच पुण्यात केले होते. त्यानंतर आता पुणे शहराच्या राजकारणातील अनेक वर्षांपासून असलेले पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्ट्राँग उमेदवाराला भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्यांची रांग लागली आहे. येत्या दिवाळीपूर्वी पुण्यात अनेक पक्षांच्या नेत्यांपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रवेश करणाऱ्यांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. काँग्रेसच्या ६ माजी नगरसेवकांसह बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे