
कुटुंबियांसाठी मागे ठेवलीये गडगंज संपत्ती…
‘महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री त्यांचं निधन झालं आहे.
पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. पण कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. अभिनेत्याच्या निधनाने टेलिव्हिजन आणि सिने विश्वात शोककळा पसरली आहे. तर पंकज धीर यांच्या निधनानंतर कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
पंकज यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, 1988 मध्ये बीआर चोप्रांच्या ‘महाभारत’ मध्ये कर्णाची भूमिका साकारताना पंकज धीर यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आजही त्यांची कर्णाची भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यानंतर पंकज धीर यांनी चंद्रकांता, युग, ग्रेट मराठा यांसारख्या मालिकेत आणि काही सिनेमांमध्ये देखील काम केलं.
झगमगत्या विश्वात काम करत असताना, त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एका रिपोर्टनुसार, पंकज धीर एका एपिसोडसाठी जवळपास 60 हजार रुपये मानधन घ्यायचे. पंकज धीर यांनी साधक, बादशाह, सोल्जर्स यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये छोट्या पण दमदार भूमिका साकारल्या.
पंकज धीर यांची एकून संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज धीर मृत्यूनंतर कुटुंबियांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेऊन गेले आहेत. ज्यामध्ये त्यांची मुंबई आणि पंजाबमधील मालमत्ता, त्यांचं बँक बॅलन्स, गुंतवणूक आणि व्यवसायातील उत्पन्न यांचा समावेश होता. त्यांनी सिनेमे, टीव्ही शो तसेच ब्रँड एंडोर्समेंटमधून पैसे कमवले. त्यांचं वार्षिक उत्पन्न 1.44 कोटींपेक्षा जास्त होतं.. असं देखील सांगण्यात येत आहे.
2006 मध्ये पंकज धीर यांनी त्यांच्या भावासोबत मुंबईतील जोगेश्वरी भागात विजय स्टुडिओज हा रेकॉर्डिंग आणि प्रोडक्शन स्टुडिओ सुरू केला. पंकज धीर यांनी अनेक नव्या कलाकारांना देखील संधी दिल्या. आणि प्रोडक्शन स्टुडिओच्या माध्यमातून देखील त्यांनी चांगली कमाई केली.