
पडद्यामागे काय घडले ?
पोलिसांनी ‘आरपीआय’ नेता प्रकाश लोंढे याच्या भोवती फास्ट आवळला आहे. अजय बागुल याच्या साथीदारांना देखील चांगलाच पोलीस प्रसाद मिळाला. त्यामुळे हे दोघेही पोलिसांच्या कारवाईने संकटात सापडले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्र्यांशी जवळीक आणि ‘आरपीआय’चा उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणून प्रकाश लोंढे यांना राजाश्रय होता. अशीच स्थिती भाजपनेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल व साथीदारांची ही होती. मात्र हे दोघेही आता चांगलेच संकटात सापडले आहेत.
‘आरपीआय’चे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, मुलगा दीपक लोंढे आणि फरारी भूषण लोंढे आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी धडा शिकवला आहे. भाजपचे अजय बागुल याच्यावर देखील कारवाई झाली. आता त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची तयारी सुरू झाली आहे.
माजी नगरसेवक लोंढे आणि अजय बागुल या दोघांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायदा लागू करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. येत्या दोन-तीन दिवसात त्यांच्या विरोधात मोकाची कारवाई होईल. ही कारवाई झाल्यावर त्यांचा पूर्ण बंदोबस्त करण्याचा निर्धार केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हंड्रेड प्लस हे टार्गेट निश्चित केले आहे. त्यासाठी वाटेल त्याला आणि कितीही वादग्रस्त असला तरी भाजप पक्षात प्रवेश दिला जात आहे. संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधालाही जुमानले जात नाही.
संदर्भात गोळीबार प्रकरणातील भाजप नेत्यासह, नांदूर नाका येथील खून प्रकरणातील माजी नगरसेवकाने नाशिकची सुत्रे हलवणाऱ्या मंत्र्यांसमवेत बैठक केली. पोलिसांना मॅनेज केले होते, असे कळते. मात्र शहरातील गुन्हेगारीने भाजपवरच बालंट आले. त्यानंतर सुत्रे थेट मुख्यमंत्र्यांनीच हलवली. त्यामुळे ‘संकट मोचन’ काही झाले नाही.
भाजपने यापूर्वी बागूल यांना भाजपमध्ये आणण्यासाठी विशेष टार्गेट केले होते. त्यासाठी त्यांच्या विरोधात पोलिस यंत्रणेचा वापर झाल्याचे आरोप आहेत. त्यातून वाचण्यासाठी सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल, मामा राजवाडे आदींचा भाजप प्रवेश झाला.
पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बागुल यांनी भाजप प्रवेश केला. मात्र शहरातील गुन्हेगारी वाढल्याने भाजपच अडचणीत आला. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी भाजपने आता डोक्यावरच्या पिलालाच पायाखाली घेतल्याचे चित्र आहे.