
छगन भुजबळांचा ओबीसी महाएल्गार सभेपूर्वी जरांगेंना थेट इशारा !
आज ओबीसी महाएल्गार सभा होत आहे. संध्याकाळी 4 वाजता ही सभा होईल. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यापूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
त्यांनी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांवर पुन्हा गंभीर आरोप केले. 2 सप्टेंबर 2025 रोजीचा जीआर रद्द करण्याची मुख्य मागणी या सभेत असेल. त्यामुळे महाएल्गार सभेनंतर वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भुजबळांचा इतिहास त्यांना माहिती नाही
ओबीसी महाएल्गार मोर्चाला मराठा आंदोलकांनी विरोध केला आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांना मोठा इशारा दिला. त्यांना माझा इतिहास माहिती नाही. शिवेसनेत असताना केलेल्या आंदोलनाची कल्पना नाही असे सूतोवाच केले. या लोकांना छगन भुजबळ यांचा इतिहास माहीत नाही. शिवसेना सोडल्यानंतर असे अनेक आव्हान पचवले आहे. जेव्हा हे सगळ लहान होते तेव्हा मी हे बघितलं आहे, असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला. महाएल्गार सभेला अनेक जण येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर मोठी टीका सुद्धा केली.
जिथं हैदोस, तिथेच महाएल्गार
जरांगेंच्या लोकांनी जिथं हैदोस घातला तिथं आजची ओबीसी महाएल्गार सभा होत असल्याचे भुजबळ यांनी जरांगेंना डिवचले. मागच्या सप्टेंबर पासून जे सुरू आहे ते आपण बघत आहात. आरक्षण जातंय या भीतीने अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. माझं या सर्वांना आवाहन आहे अस करू नका.आरक्षणाला धक्का लागणार नाही या साठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. ज्या बीड मध्ये जरांगेच्या लोकांनी धुडगूस घातला. आमदारांची घरे जाळली. ओबीसी नेत्यांवर हल्ले केले. तिथे हा ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके असे सगळे लोक उपस्थित राहणार आहे अशी माहिती भुजबळांनी दिली.
एक पक्षाचा मेळावा नाही
ओबीसी महाएल्गार मेळावा अजित पवार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना हा कोणत्याही पक्षाचा मेळावा नाही. मात्र सर्वपक्षीय नेते एकवटणार आहेत. राज्यातील ओबीसी नेते एकत्र येणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या मेळाव्याला हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आमच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नसल्याचे सांगत या मोर्चाला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले.