
सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा झाला. यावेळी ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाविरोधात आक्रमक भाषणे केली.
यावेळी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी आक्रमक भाषेत सरकारवर टीका केली. पण, यावेळी पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरीची चांगलीच चर्चा रंगली होती. आता याबाबत पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमधील मेळाव्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मला पाहायला वेळ मिळाला नाही. मी भाषणे थोड्या वेळाने बघेन. शिवाजीराव कर्डिले अचानक वारले, माझे त्यांच्या परिवाराबरोबर इतके जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. छगन भुजबळ यांनी यापूर्वीही असे मिळावे केले होते, त्यांची बाजू त्यांनी मांडली असावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना, मी भाषण पाहिले नाही, असे पुन्हा एकदा सांगितले. धनंजय मुंडेंनी केलेल्या विधानांवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणे टाळल्याचे यावेळी दिसून आले. अंगावर आले की शिंगावर घ्या, असे विधान भाषणावेळी धनंजय मुंडे यांनी केले होते. त्यावर, पकंजा मुंडे म्हणाल्या की, कोणत्याही भाषणावर मी बोलत नाही. बोलू शकते पण मी बोलत नाही. मी दुसऱ्यांच्या भाषणावर कधी टीकाटिपण्णी केली नाही. ते चांगले वक्ते आहेत, काय चांगले बोलले असेल ते सांगा, असे पंकजा यांनी म्हटले आहे.
मंत्री पंकजा मुंडे या यंदाच्या ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेत उपस्थित राहणार अशा चर्चा होत्या. पण, त्या सभेला उपस्थितीत राहिल्या नाहीत. गेल्या वर्षी जालना येथील ओबीसींच्या एल्गार सभेलाही पंकजा मुंडे गैरहजर राहिल्या होत्या. आधी जालना आणि आता बीडमध्येही पंकजा मुंडे यांनी दुसऱ्यांदा भुजबळ आणि ओबीसींचे व्यासपीठ टाळल्याची चर्चा सुरु आहे. बीडमधील ही सभा आधी रद्द करण्यात आली होती. पण, 17 ऑक्टोबर रोजी ही सभा घेण्यात आली. या सभेत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर या सगळ्याच नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्रमकपणे टीका केली.