
सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी गुरुवारी (ता १६ ऑक्टोबर) मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यातील तीन माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून एक काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यामुळे भाजपने सोलापूरमध्ये आपल्या मित्रपक्षाला दणका देण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहेत. त्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मोहोळचे माजी आमदार तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार आहेत. काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे हे माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची आता फक्त तारीख ठरण्याचे बाकी आहे.
मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम करूनही उमेश पाटील यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हाध्यक्ष केले, त्यामुळे राजन पाटील गट नाराज झाला होता. त्याचवेळी राजन पाटील गटाकडून भाजपशी जवळीक साधली जात होती.
उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष केल्यानंतर मोहोळच्या राजकारणात समतोल साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले होते. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद देण्यात आले होते. मात्र, नाराज राजन पाटील गटाने अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
यशवंत माने हेही मोहोळमधून निवडून आले होते. ते राजन पाटील यांच्यासोबत आहेत, त्यामुळे राजन पाटील जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. उमेश पाटील यांच्या प्रखर विरोधामुळे यशवंत माने यांची दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी हिरावली गेली होती. ती खंत माने यांच्या मनात होती.
माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या अमेरिकेत आहेत. मात्र, त्यांचे दोन्ही सुपुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे मोहोळ, माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार हे निश्चत आहे.
सर्वाधिक अडचणी ही दिलीप माने यांच्या भाजपप्रवेशाबाबत असल्याची माहिती आहे. कारण माजी आमदार माने यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत. त्यांचा माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध असल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावरही उपाय केला असल्याची माहिती आहे. माने हे जरी काँग्रेसचे माजी आमदार असले तरी ते अजित पवार समर्थक मानले जातात, त्यामुळे खुद्द फडणवीसांनी अजितदादांना धक्का देण्याची पुरेपूर तयारी केल्याचे दिसून येत आहे.