
बडा नेता भाजपच्या गळाला ?
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली, लोकसभेमध्ये मिळालेलं यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही, विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं.
तर दुसरीकडे राज्यात महायुतीच्या तब्बल 232 जागा आल्या, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीमधून माहायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं, अनेक बड्या नेत्यांनी या काळात महायुतीमध्ये प्रवेश केला. सर्वाधिक प्रवेश हे शिवसेना ठाकरे गटातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात झाले. तर दुसरीकडे याचा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील बसला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपच्या वाटेवर आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पुढील निवडणुकीबाबत चर्चा झाली असं दिलीप माने यांनी म्हटलं आहे. परवा दिवशी आम्हाला निरोप आला, मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला वेळ दिली आहे, तुम्ही सायंकाळी सात साडेसातला या, आम्हाला सगळ्यांनाच असा निरोप आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची आम्ही भेट घेतली, असं दिलीप माने यांनी म्हटलं आहे. दरम्यान जर आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यास, ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी हा काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा आणखी एक धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यात आहे. दिलीप माने यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे, ते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.