
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात निर्णय घेणारे जीआर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर ओबीसीच्या हक्काच्या लढाईसाठी मंत्री छगन भुजबळ पुन्हा मैदानात उतरले आहेत. आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे ओबीसींचा महायल्गार मेळावा झाला. या मेळाव्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार भाषण करत मराठा आरक्षणावर आपले मत मांडले.
गोपीचंद पडळकर यांनी ओबीसींना आवाहन करणारे भाषण केले. ते म्हणाले की आपला ओबीसीचा एकच नेता आहे आणि तो म्हणजे छगन भुजबळ.. आपण काही सर्वच नेते होऊ शकत नाही. छगन भुजबळ ठरवतील तिच दिशा आपली आहे असेही पडळकर यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की भुजबळ साहेब तुम्ही सांगाल त्या दिशेसोबत आम्ही आहोत. सरसकटचं प्रकरण आलं. आमच्या मामीला द्या, मामाच्या मामीला द्या. काकाच्या पुतण्याला द्या.गेल्यावर्षी हे प्रकरण आलं.त्याचं अखेर वादळ उठलं. भुजबळांच्यासोबत आलो आणि सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं असाही दाखल पडळकर यांनी आपल्या भाषणात उपस्थित समुदायाला दिला.
मराठा समाज छोट्या समाजाचं ‘सरपंच पद’ हिसकावू पाहतोय
गरीब मराठ्यांच्या विरोधात ना गोपीनाथ मुंडे होते ना छगन भुजबळ आहे. तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्याचं आम्ही समर्थन करीत आहोत. ओबीसी सर्व समाज आपला गरीब मराठा समाजाला वेगळं एसईबीसीचं आरक्षण दिलं त्याचं काल समर्थन करत होता आणि आजही करतोय तसेच उद्याही करतो असे यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही.गरीब मराठ्यांचं भांडवल करून प्रस्थापित मराठा समाज छोट्या समाजाचं ‘सरपंच पद’ हिसकावू पाहतोय. त्याला आमचा विरोध आहे. म्हणे सुताराचा मुलगा सरपंच झाल्यावर कसं पुढे बसणार? त्यांना गरीबांची मुलं सरपंच पदावर बसलेले आवडत नाही. त्यामुळे त्यांनी आरक्षणाचा घाट घातला आहे. आम्ही हा घाट हुसकावून लावू अशी घोषणाच गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली.
तुमचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही
पडळकर पुढे म्हणाले की तुम्ही जीआरची चिंता करू नका. भुजबळ लढत आहेत. आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळालेले नाही. भुजबळ साहेब त्यासाठी ताकदीने लढत आहेत. जो प्रांत खोटा जात दाखला देईल, जो जात पडताळणी प्रमुख खोटा दाखला देईन त्यांना बीडच्या तुरुंगात टाकला पाहिजे, म्हणून त्यावर निर्णय आला पाहिजे. ही सर्व लोकं आपल्यासोबत आहे. १७ जिल्ह्यात १२ कोटी लोकं आहेत का रे ? कुठलं कॅलक्युलेटर आहे तुमच्याकडे ? जेव्हा जात निहाय जनगणना होईल तेव्हा तुमचा बाजारउठल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिला.