जगभरात खळबळ…
चीनकडून अमेरिकेला रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा करण्यात येत होता, मात्र आता चीनने अचानक अमेरिकेला होणारी रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात थांबवली आहे. एवढंच नाही तर चीन हा अमेरिकेमध्ये उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार देश होता, मात्र चीनने अमेरिकेकडून सोयाबीनची आयात देखील बंद केली आहे.
चीनने अमेरिकेला एकापाठोपाठ दोन मोठे धक्के दिले, त्यानंतर संतापलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर तब्बल शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे जगात नव्या व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे, याचा फटका हा अमेरिका आणि चीनसोबतच इतर देशांना देखील बसत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
पुन्हा एकदा चीन आणि तैवानमधील संघर्ष वाढला आहे. तैवानच्या समुद्री क्षेत्रात पुन्हा एकदा चीनच्या नौदलाचे जहाजं दिसून आले आहेत, एवढंच नाही तर चीनने पुन्हा एकदा तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तैवानच्या समुद्री हद्दीमध्ये चीनच्या नौदलाचे चार जहाजं दिसून आले आहेत. एवढंच नाही तर चीनच्या तीन लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात देखील घुसखोरी केली आहे. यातील एका लढाऊ विमानाने तर मध्य रेखा देखील पार केल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे, सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, गरज पडल्यास आम्ही देखील आवश्यक ती पाऊलं उचलू असा थेट इशाराच तैवानकडून देण्यात आला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील चीनने एकदा तैवानच्या हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी चीनने आठ जहाज तैवानच्या समुद्री क्षेत्रात घुसवले होते, तर चीनच्या काही लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी केली होती, चीनच्या या कुरापतींमुळे आता तैवान आणि चीनमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे


