इंदापुरचे जावई किती श्रीमंत?
बिहारचा सिंघम म्हणून ओळख असलेले माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे मुंगेर आणि अररिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आयपीएस अधिकारी म्हणून सेवा केल्यानंतर आता ते राजकारणात आपलं नशीब आजमावत आहेत. शिवदीप लांडे हे शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत त्यातून शिवदीप लांडे यांची संपत्ती समोर आली आहे.
शिवदीप लांडे यांची संपत्ती किती ?
शपथपत्रातील माहितीनुसार, शिवदीप लांडे यांच्या बँक खात्यांमध्ये २० लाख ३३ हजार रुपये इतकी रक्कम जमा आहे. विशेष म्हणजे, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये ६.६५ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक (Investment) केली आहे, जी त्यांच्या एकूण संपत्तीचा मोठा भाग आहे. लांडे यांच्यावर २ कोटी ५ लाख रुपयांचे गृहकर्ज (Home Loan) देखील आहे.
तसेच, त्यांच्याकडे २० लाख रुपये किमतीची एक कार (Car) असल्याची नोंद आहे. शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवदीप लांडे या एक बिझनेस वुमन आहेत. त्यांच्याकडे १०० ग्रॅम सोने असल्याची माहिती शपथपत्रात नमूद आहे. शपथपत्रानुसार, शिवदीप लांडे यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी खटले दाखल नाहीत.
शिवदीप लांडेंनी मुंगेरी मतदारसंघ का निवडला ?
शिवदीप लांडे यांनी मुंगेर मतदारसंघ विचारपूर्वक निवडला आहे. ते २००९ मध्ये मुंगेरमध्ये एएसपी म्हणून रुजू झाले होते आणि २०११ पर्यंत तिथेच काम केले. तीन वर्षांत मुंगेर मधील गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला. त्यामुळे तेथिल तरुणाईत शिवदीप लांडे यांची लोकप्रियता आहे. त्यानंतर शिवदीप यांनी आयजी पदाचा राजीनामा दिला.
भाजप उमेदवाराचे तगडे आव्हान…
भाजपने मुंगेर विधानसभा मतदारसंघात प्रणय कुमार यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे शिवदीप लांडे यांचा सामना भाजपच्या प्रणय कुमार यांच्याशी होणार आहे. प्रणय कुमार हे तारापूर जिल्ह्यातील असून ते वैश्य समाजाचे आहेत. वैश्य समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपनं प्रणय यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे मुंगेर मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. शिवदीप लांडे यांनी सेवेत असताना केलेल्या कामाच्या आधारावर मतदार मतदान करणार का हे पहावं लागेल.
प्रणय कुमार यांच्याकडे बँक खात्यात १३ लाख ४१ हजार रुपये इतकी रक्कम जमा आहे. सोने आणि चांदीच्या स्वरूपातही त्यांच्याकडे मोठी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३० लाख रुपये किमतीचे सोने (Gold) आहे, तर १ लाख ३० हजार रुपये किमतीची चांदी (Silver) देखील त्यांच्या मालकीची आहे तसेच प्रणय कुमार यांच्यावर २८ लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज आहे.


