उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सरनाईक यांचा मुलगा विहंग हा ‘मुंबई क्रिकेट असोशिएशन’च्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे.
या संघटनेतील पवारांचे असणारे राजकीय वजन पाहता सरनाईक यांच्या भेटीला महत्त्व आहे.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र तथा मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक होते. पवार यांना भेटून बाहेर पडताना सरनाईक यांनी ‘दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवारांची भेट घेतली’ असे माध्यमांना सांगितले.
‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या कार्यकारी समितीची त्रैवार्षिक निवडणूक १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना ‘लोढा समिती’च्या शिफारशीनुसार यावेळी निवडणूक लढवता येणार नाही. असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीवर शरद पवार गटाचे वर्चस्व आहे. विहंग यास असोसिएशनचा अध्यक्ष करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पवारांची भेट घेतल्याचे समजते.
‘एमसीए’चा मुंबई संघ भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. मुंबई क्रिकेट संघाने विक्रमी ४१ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. विजय मर्चंट, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांसारखे ‘टीम इंडिया’चे दिग्गज खेळाडू ‘एमसीए’च्या संघाकडून खेळले आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात क्रिकेटचे संचालन करणाऱ्या संस्थांपैकी ‘एमसीए’ एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे.
‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू व शिंदे शिवसेनेचे आमदार किरण सामंत, भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड हे इच्छुक आहेत. सामंत आणि लाड यांनी मागच्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पवार गटाचे आहेत. मागच्या निवडणुकीत भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांच्या उमेदवाराचा पवार गटाच्या उमेदवाराने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव केला होता. ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’वर कायम राजकीय मंडळीचे वर्चस्व राहिलेले आहे.
विहंग कोण आहेत ?
विहंग सरनाईक हे शिंदे शिवसेनेचे आमदार व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. विहंग हे एकेकाळी अखंड शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी व आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. सध्या ते ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’चे सदस्यही आहेत. सरनाईक कुटुंबियांवर ‘ईडी’ने कारवाई केली तेव्हा विहंग यांचीसुद्धा चौकशी झाली होती.


