मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना…
गाझा युद्धविराम लागू असतानाच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अचानक इजिप्त दौरा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. इस्रायलच्या कतारवरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तान सुपर ॲक्टिव्ह झाला असून, मुस्लिम देशांशी लष्करी संबंध मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मुनीर यांचा इजिप्त दौरा का?
पाकिस्तानने नुकताच जगातील सर्वात प्रभावी मुस्लिम देश असलेल्या सौदी अरेबियासोबत मोठा संरक्षण करार केला आहे. या करारामुळे इजिप्त नाराज असल्याची चर्चा आहे. इजिप्तची नाराजी दूर करण्यासाठी आणि संबंध मजबूत करण्यासाठी मुनीर तातडीने कैरो येथे पोहोचले आहेत.
पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, असीम मुनीर यांनी इजिप्तला बंधुत्वाचा देश म्हटले आहे. त्यांनी इजिप्तचे संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांशी भेट घेतली, ज्यात परस्पर हिताचे मुद्दे, प्रादेशिक परिस्थिती आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. मुनीर म्हणाले की, “पाकिस्तान आणि इजिप्तच्या सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या जनतेला फायदा होईल आणि प्रदेशात शांतता स्थापित होईल.”
सौदी-पाक डीलमुळे मिस्रमध्ये नाराजी
विश्लेषकांच्या मते, मुनीर यांच्या या दौऱ्याचा मूळ उद्देश सौदी अरेबिया आणि अणुबॉम्बने सज्ज पाकिस्तान यांच्यातील संरक्षण करारामुळे नाराज झालेल्या इजिप्तला शांत करणे हा आहे. ‘न्यू अरब’च्या अहवालानुसार, या करारानंतर इजिप्तमध्ये ही चर्चा सुरू झाली की, सौदी अरेबियाने इजिप्तच्या सैन्याऐवजी पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास का दाखवला?
१६ सप्टेंबर रोजी कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या अरब इस्लामिक शिखर परिषदेत या मुद्द्याचा खास उल्लेख झाला. या बैठकीत इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल सीसी यांनी अरब आणि मुस्लिम देशांच्या सुरक्षेसाठी समन्वयाची एक ‘मेकॅनिझम’ तयार करण्याची मागणी केली होती. इजिप्त २०१५ पासून संयुक्त अरब मुस्लिम सैन्य स्थापन करण्याची मागणी करत आहे.
पाकचा हेतू – संरक्षण करार आणि पैसा
इस्रायलच्या हल्ल्यामुळे भयभीत झालेल्या मुस्लिम देशांशी लष्करी संबंध वाढवून पाकिस्तानला पैसे कमवायचे आहेत. पाकिस्तान सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकणार आहे. तसेच, लष्करावर मोठा खर्च करणाऱ्या इजिप्तलाही तो गमावू इच्छित नाही.
भारताचा जवळचा मित्र इजिप्त
सौदी-पाकिस्तान संरक्षण करारानुसार, एका देशावर हल्ला झाल्यास तो दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल. या करारामुळे सौदी अरेबियाला पाकिस्तानची अप्रत्यक्ष ‘अणुछत्री’ मिळाली आहे, तसेच अमेरिकेवर अवलंबून असलेल्या सौदीला पडद्याआड चिनी शस्त्रास्त्रांचा ॲक्सेस मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, इजिप्त हा भारताचा जवळचा मित्र देश आहे. २०२३ मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल सीसी भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत झाले आहे. अरब देशांच्या संरक्षणासाठी ‘नाटो’सारखे सैन्यदल असावे, यावर इजिप्तचा सतत भर आहे.


