 
                लवकरच महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकांच्या घोषणा होण्याआधी मोठ्या प्रमाणात पक्षांतरं पहायला मिळू शकतात.
त्याची सुरुवात देखील झाली आहे. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीतील पक्षांमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. यात शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक फटका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
आता रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीय. नागेंद्र राठोड यांनी काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. ते आता भाजपच्या गळाला लागले आहेत. राठोड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या 28 ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने राठोड यांचा पक्ष प्रवेश भाजपसाठी रायगडमध्ये महत्वाचा ठरणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं.
गळती अजूनही थांबलेली नाही
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच राजकारण बदलायला सुरुवात झाली. युतीमध्ये निवडणुका लढवणाऱ्या शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले. त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं.
पुढे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्ष कोणाचा? हा वाद निवडणूक आयोगाकडे केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे गटाला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                