दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी : राजेंद्र पिसे
नातेपुते : येथील एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विभागातील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री अभिजीत बळीराम वाळके यांना ओन्ली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025” जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचा गौरव सोलापूर उपजिल्हाधिकारी सौ. अंजली मरोड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून करण्यात आला.
गेल्या 28 वर्षांपासून श्री. वाळके हे नातेपुते एज्युकेशन सोसायटीमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित शिक्षण या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी व आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना पात्र ठरवण्याचा मानही त्यांच्या खात्यावर आहे. याशिवाय नवोदय, आयएएस मंथन व विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे.
शाळेमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती, बास्केटबॉल किट, वृक्षारोपण, महिला दिन, सांस्कृतिक उपक्रम, विमान सहल, उन्हाळी व दिवाळी तालीमवर्ग असे नवे उपक्रम राबवून ते तंत्रस्नेही, उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सुट्यांमध्ये स्वखर्चाने वर्ग घेण्याचे कामही त्यांनी हाती घेतले. 1998 ते 2006 दरम्यान पोलिओ लसीकरण मोहिम व राष्ट्रीय साक्षरता अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
यापूर्वीही तिन आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले असून पालकांमध्ये, “आमच्या मुलांना वाळके सरांनीच शिकवावे” अशी मागणी नेहमीच होत असते.
कार्यक्रमास पोलीस निरीक्षक कुकडे, संस्थेचे चेअरमन राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, उपाध्यक्ष संतोष शेळगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना श्री. वाळके म्हणाले,
“आजचे शिक्षण हे केवळ नोकरीपुरते न राहता मूल्याधिष्ठित असावे. विद्यार्थ्यांनी समाज आणि देशासाठी घडले पाहिजे—हीच आमची खरी शिक्षक म्हणून भूमिका आहे.”


