एका घोषणेने राजकारण ढवळून निघणार !
आगामी नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील, अशी घोषणाच आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली आहे. या घोषणेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीत आघाडी घेतली असली तरीही महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्यस्तरावर घटकपक्षांची एकत्रित महाविकास आघाडी या स्थानिक निवडणुकीत एकत्र राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक स्तरावर कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्था आहे. त्यामुळे ‘आम्ही तुम्हाला जमेतच धरत नाही’ असा थेट मेसेज त्यांना द्यायचा आहे का? असा सवाल उपस्थित झाला असून घटकपक्षांत मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मातोश्रीवर जात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला जम्यात धरत नसल्याची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राज्याच्या राजकारणात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी स्थिती आहे. जयंत पाटील या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. ईश्वरपूर (इस्लामपूर) नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणात मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षाला महत्त्वाचे स्थान दिले जाताना दिसत नाही. राष्ट्रीय काँग्रेस आणि आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अलीकडे वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये असलेला वाद वरिष्ठांपर्यंत पोचला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेना उबाठा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, पुरोगामी समविचारी संघटना या सर्व संघटनांनी एकत्र येऊन महायुतीला तोड देण्याचा इतिहास आहे. पण यावेळी मात्र प्राथमिक स्तरावर अशी कोणतीही चर्चाच झालेली नाही. आमदार जयंत पाटील यांनी सुरुवातीलाच ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
जिल्हा स्तरावर मात्र खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम यांच्यासोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतल्याची चर्चा होती. असे असताना स्थानिक पातळीवर मात्र त्यांनी ही चाल अशी का खेळली याबाबत अन्य घटक पक्षांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यानी इतर घटकांशी चर्चा करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
दुसरीकडे महायुती किंवा शहर विकास आघाडी यांच्यात मात्र संबंधित घटक पक्ष एकत्र येऊन चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. प्रभागनिहाय चर्चा आणि उमेदवार ठरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच इतर वेळी घाई न करणाऱ्या आमदार जयंत पाटील यांनी मात्र यावेळी आपला उमेदवार घोषित करून निवडणूक रिंगणात आघाडी घेतली आहे.
हे करत असताना त्यांनी समविचारी पक्षांना विश्वासात न घेतल्याने या आघाडीच्या समन्वयाबाबाबत शंका उपस्थित होत आहे. जयंत पाटील यांना कट्टर विरोध करणारा काँग्रेस मधील एक गट काही केल्या त्यांच्यासोबत जाणार नसला तरी ज्यांचे विरोधकांशी जुळुच शकत नाही अशांना त्यांनी गृहीत धरणे अपेक्षित होते.
आमदार जयंत पाटील आपणाला विश्वासात घेणार नसतील तर काही कार्यकर्ते तिसरा पर्याय विचारात घेण्याच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विचार झाल्यास सत्ताधारी आणि विरोधकांना दोघांनाही काही प्रमाणात याचा फटका बसणार आहे. त्यामुळे आमदार पाटील याबाबत कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


