पण आता भगतसिंगगीरी सुरू होईल !
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ट्रॅक्टर-बैलगाडा मोर्चा नागपूरवर धडकला असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.
वर्धा मार्गावरील पांजरा वळण रस्त्यावर हजारो शेतकरी मागील दोन दिवसांपासून ठिय्या देऊन बसले आहेत. काल रात्री बच्चू कडू स्वतः शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर झोपले, तर आज सकाळी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू ठेवले.
“उघड्यावरची रात्र आम्हाला नवीन नाही, पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा? सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहायचं ठरवलंय का? मग तयार राहा – आता भगतसिंगगीरी सुरू होईल!” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला.
या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलक काल रात्रभर रस्त्यावर झोपले आणि आज सकाळी रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीची मागणी करत कालपासून नागपुरात ट्रॅक्टर-बैलगाडा मोर्चा धडकला आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी वर्धा मार्गावर पांजरा वळण रस्त्यावर आंदोलन करत आहेत. काल रात्रभर आंदोलक शेतकरी रस्त्यावरच झोपून ठिय्या देत होते, तर आज सकाळीही त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.
या आंदोलनामुळे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा दिशेकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाहतूक ठप्प झाल्याने नागपूर शहरातील महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मिहान आणि जामदाकडे जाणाऱ्यांनाही प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ आज नागपूरला दाखल झाला. सकाळपासूनच वर्धा मार्गावर ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि हजारो शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. या मोर्चामुळे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून, संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरावतीतून निघालेला हा मोर्चा वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतून प्रवास करत नागपूरच्या वेशीवर पोहोचला. ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’, ‘कर्जमाफी द्या नाहीतर गादी सोडा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाला धसका दिला. नागपूर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त जवान तैनात केले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘रामगिरी’ निवासस्थानासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी आज वर्धा मार्गावरच ठिय्या देत रात्रीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवरच हे आंदोलन उभारण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून, मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा इशारा दिला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, सामाजिक कार्यकर्ते विजय जावंधिया, ॲड. वामन चटप आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती होती. सर्व नेत्यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सरकार फक्त आश्वासन देते, पण प्रत्यक्ष निर्णय घेत नाही, अशी टीका या नेत्यांनी केली. शेतकऱ्यांच्या या निर्धारामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात प्रशासन सतर्क झाले आहे. आंदोलनाचे रूप अधिक तीव्र झाल्यास दिल्लीप्रमाणे दीर्घकालीन संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.


