सातारा डॉक्टर प्रकरणात अंधारेंनी दाखवला हादरवणारा पुरावा…
सातारा जिल्ह्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येचे प्रकरण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. हे प्रकरण ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चांगलेच लावून धरले आहे.
त्यांनी भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले आहेत. सोबतच डॉक्टर महिलेने आत्महत्या केली नसून यामागे तिचा खून करण्यात आला असावा, अशी शंकाही उपस्थित केली आहे. हीच शंका उपस्थित करताना अंधारे यांनी आज नवे आणि खळबळजनक पुरावे सादर केले आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसचा मुद्दा उपस्थित करून गंभीर प्रश्न विचारले आहेत.
एकच शब्द वेगवेगळा कसा लिहला जाऊ शकतो?
सुषमा अंधारे यांनी आज (29 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत नवे पुरावे सादर केले. यावेळी त्यांनी डॉक्टर महिलेने आरोग्य विभागाकडे केलेली तक्रार आणि तिच्या तळहातावर लिहिलेल्या शेवटच्या संदेशाच्या हस्ताक्षराची तुलना केली. एकच मुलगी दोन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे शब्द कसा लिहू शकते, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.
मृत्यूनंतर व्हॉट्सअॅप स्टेटस लाईक कसे केले जाऊ शकते
मी नुकतेच डॉक्टर महिलेच्या बहिणीला तसेच तिच्या भावाशी संपर्क केला. माझा डॉक्टर महिलेच्या भावाशी संपर्क होऊ शकला नाही. तुम्ही वेळेबद्दल काहीतरी प्रश्न उपस्थित करत होत्या, असं मी त्यांना विचारलं. याबाबत बोलताना मला समजलं की सातारा डॉक्टरचे प्रकरण समोर आले त्या दिवशी डॉक्टर तरुणीच्या बहिणीने तिला कॉल केला होता, असे म्हणत अंधारे यांनी पुढे गंभीर प्रश्न उपस्थित केले.
बहिणीने एक स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवलेले होते
डॉक्टर महिलेच्या बहिणीने केलाला फोन कॉल पोलिसांनी उचलला होता. डॉक्टरच्या बहिणीला वाटले की माझ्या बहिणीचा फोन चोरीला गेला. त्यामुळे बहिणीने विचारलं की माझ्या बहिणीचा फोन तुमच्याकडे कसा आला? त्यानंतर तिकडून सांगण्यात आलं की तुमच्या बहिणीने आत्महत्या केली. ही घटना संध्याकाळी सात वाजता घडली, असे सांगण्यात आले. पण मृत डॉक्टर महिलेच्या बहिणीने एक स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवलेले होते. तेच स्टेटस 11 वाजून 6 मिनिटांनी मृत डॉक्टरने लाईक केलेले आहे, असे अंधारे यांनी तपशीलवार सांगितले. तसेच डॉक्टर तरुणी मृत्यू अगोदरच झालेला असेल असे सांगितले जात असेल तर मृत डॉक्टर तरुणी रात्री अकरा वाजता स्टेटस लाईक कशी करू शकतो, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.


