देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य; बच्चू कडूंना सावध करत म्हणाले…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू, राज्यातील अनेक शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) संध्याकाळपासून नागपूर-हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
दुसऱ्या बाजूला सरकारने आंदोलकांच्या नेत्यांना चर्चेसाठी मुंबईत येण्याचं निमंत्रण पाठवलं होतं, मात्र, बच्चू कडू व इतर शेतकरी नेत्यांनी सरकारला नागपूरमध्ये येण्याची विनंती केली. दरम्यान, या आंदोलनावर व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिकेत आहे. हे आंदोलन होण्याआधी आम्ही आंदोलनाची हाक देणाऱ्या नेत्यांना व त्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं. चर्चा करून शक्य ते उपाय शोधू असं आम्ही सांगितलं होतं.
बच्चू कडू व शेतकरी नेते चर्चेला आले नाहीत : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, “बच्चू कडू आम्हाला सुरुवातीला म्हणाले होते की आम्ही या बैठकीला येऊ. त्यानंतर अर्ध्या रात्री त्यांनी मला संदेश पाठवला की आंदोलनाच्या ठिकाणी लोक जमा होत आहेत. तिथे आम्ही नसल्यामुळे अडचण होऊ शकते. त्यामुळे आम्ही बैठकीला येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या मताचा आदर राखत बैठक रद्द केली.”
“आज (२९ ऑक्टोबर) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. बच्चू कडू यांनी यावेळी वेगवेगळे प्रश्न मांडले. परंतु, हे प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून सोडवू शकू अशी सध्या परिस्थिती नाही. त्यावर चर्चा करून एक रोडमॅप तयार करावा लागेल. यासाठीच आम्ही बच्चू कडू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. परंतु, अजूनही त्यांच्यापैकी कोणी चर्चेला आलेलं नाही.”
आंदोलादरम्यान रुग्णांना त्रास होऊ नये, फडणवीसांचं आंदोलकांना आवाहन
आंदोलकांनी वाहतूक ठप्प केल्यामुळे, रस्ते अडवल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये रुग्णवाहिकांना रुग्णालय गाठण्यात त्रास झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे माझं सर्व आंदोलकांना व त्यांच्या शिष्टमंडळांना, नेत्यांना आवाहन आहे की तुम्ही सरकारशी चर्चा करायला हवी. वाहतूक अडवू नये किंवा त्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये.
आंदोलकांना रेल रोको करण्याचा प्रयत्न करू नये : मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आंदोलकांनी लोकांना त्रास होईल असं काहीही करू नये. अशा प्रकारच्या आंदोलनात काही हौसे नवसे गवसे शिरतात. अर्थात या आंदोलनात शेतकरी देखील आहेत. परंतु, अनेक लोक, वेगवेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात शिरून आंदोलनाला हिंसक वळण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे. आंदोलकांनी रेल रोको, रास्ता रोको, चक्काजाम अशा गोष्टी करू नयेत आणि आम्ही त्यांना अशा गोष्टी करूही देणार नाही.


