165 पैकी 83 जागा महिलांसाठी राखीव…
महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. 11 नोव्हेंबरला प्रभागांचे आरक्षण जाहीर होणार आहे. दरम्यान, या पंचवार्षिकमध्ये महापालिकेवर महिलाराज येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
एकूण 165 नगरसेवकांच्या जागांपैकी तब्बल 83 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर उर्वरित 82 जागा पुरुषांसाठी राखीव राहणार आहेत. विशेष म्हणजे, खुल्या गटात पक्षांनी महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास महिलांचे प्रतिनिधित्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या होत्या. या निवडणुका कधी होतील, याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान, सुप्रिम कोर्टाने या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाला वेग आला आहे. या निवडणुका जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.
प्रभागरचना अंतिम झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. त्यात आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आरक्षण सोडतीचे वेळापत्रक आयोगाने प्रसिद्ध केले असून, त्यानुसार 11 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यापूर्वी एससी, एसटी, ओबीसी आणि महिला आरक्षणाचा आराखडा आयोगास सादर करण्याचे निर्देश होते. पुणे महानगरपालिकेने ही माहिती वेळेत सादर केली असून, त्यातूनच महिलांसाठी 50 टक्के आरक्षण निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात होणार रंगीत तालीम
आरक्षण सोडतीपूर्वी महापालिकेमार्फत 8 नोव्हेंबर रोजी रंगीत तालीम घेतली जाणार आहे. ही रंगीत तालीम महापालिका मुख्यालयात किंवा बालगंधर्व रंगमंदिरात घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आरक्षणाची अधिकृत सोडत काढली जाणार आहे. प्रभागांतील लोकसंख्येच्या आधारावर एससी व एसटी आरक्षणाचे वाटप केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रभागांची रचना आणि आरक्षण
पुण्यातील या निवडणुकीत एकूण 41 प्रभाग आहेत. त्यापैकी 40 प्रभाग चारसदस्यीय, तर आंबेगाव-कात्रज (क्रमांक 38) हा पाचसदस्यीय प्रभाग आहे. या प्रभागात तीन जागा महिलांसाठी राखीव असतील. एकूण 165 नगरसेवकांपैकी अनुसूचित जातींसाठी (एससी) 22 जागा, अनुसूचित जमातींसाठी (एसटी) 2 जागा, इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यासाठी 44 जागा राखीव आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची आरक्षणे वगळल्यानंतर खुल्या गटासाठी केवळ 48 जागा उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली.


