मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; महायुतीत ठिणगी पडणार ?
भाजप वगळता अन्य पक्ष व्यक्तींच्या नावाने ओळखले जातात. राष्ट्रवादी हा शरद पवारांचा, शिवसेना उद्धव ठाकरेंचा, तर मनसे राज ठाकरेंचा पक्ष म्हणून ओळख आहे.
भाजप हा नेत्यांच्या नावाने नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या नावाने ओळखला जातो” असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी तयार झाल्या. दोन्ही पक्ष खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी आमचीच आहे म्हणत न्यायालयात गेले आहेत. दरम्यान, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये असताना देखील चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम व्यवस्थित, विधानसभेत मात्र घोटाळा वाटतो
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे आता त्या गटाचा भाग झाले आहेत. कॉलेजच्या काळापासूनच मला राज ठाकरे यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. मात्र, आज ते त्या गटात सामील झाले आहेत. सध्या मी कोणाबद्दलही नकारात्मक बोलणे टाळतो, पण ज्यांच्या गटात पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधील इतर नेते आहेत, त्यांना लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम व्यवस्थित वाटते, मात्र विधानसभेत मात्र घोटाळा दिसतो. आम्ही लोकसभेत 41 जागा जिंकूनही नंतर 17 जागांवर कसे आलो, हा प्रश्न आम्हालाही पडला होता. तरीदेखील आम्ही प्रणालीवर विश्वास ठेवला. पण आता ते सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, ज्यामुळे अराजकता निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागेल.
विरोधकांच्या मोर्चामागे काहीतरी वेगळं आहे. मनात काही आणि ओठांवर काही. जर मनात राग असेल, तर तो स्पष्टपणे व्यक्त केला पाहिजे. केजरीवाल हरले की लगेच ईव्हीएमला दोष दिला जातो. त्यामुळे हा मोर्चा हा केवळ एक राजकीय नाटक आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


