ईराणमध्ये चालू आहे ट्रम्प यांना घाम फोडणारी मोहीम…
अमेरिकेसह जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेले अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा बांधले जाणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
हे प्रकल्प पूर्वीपेक्षा खूप मजबूत असतील असंही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर इराणचे ध्येय अणुशस्त्रे विकसित करणे नसून सार्वजनिक कल्याण आणि वैद्यकीय संशोधनाला चालना देणे हे आहे असं म्हटलं आहे. मात्र एका माजी वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्याने इराण दोन आठवड्यांत अणुबॉम्ब विकसित करू शकतो असं विधान केले आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
अणुप्रकल्प पुन्हा उभे राहणार
इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी अलिकडेच देशातील अणुऊर्जा संघटनेला भेट दिली आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘इमारती आणि कारखान्यांचा झालेला नाश आपल्यासाठी त्रासदायक नाही. आपण ते पुन्हा बांधू आणि यावेळी ते पूर्वीपेक्षाही मजबूत असेल. आपल्याला याचे बांधकाम करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’
दोन आठवड्यांत अणुबॉम्ब विकसित होणार
इराण अणु प्रकल्पाचे बांधकाम पुन्हा सुरू करणार आहे. अशातच आता माजी वरिष्ठ इराणी न्यायिक अधिकारी मोहम्मद-जवाद लारीजानी यांनी अणुबॉम्बबाबत मोठे विधान केले आहे. इराणकडे दोन आठवड्यांत अणुबॉम्ब विकसित करण्याची क्षमता आहे, मात्र सरकारने याला नकार दिला आहे. सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी शिया न्यायशास्त्रावर आधारित अण्वस्त्रांविरुद्ध एक कडक फतवा जारी केला आहे.ते इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा विस्तार करण्याबाबत सकारात्मक आहेत, मात्र अणुबॉम्ब तयार करण्याच्या विरोधात आहेत.
जून महिन्यात इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध झाले होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला होता. तसेच अमेरिकेनेही या युद्धात उडी घेत इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला होता. यासाठी अत्याधुनिक बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘या हल्ल्यामुळे खूप जास्त विनाश झाला आहे, इराण आता त्या पुन्हा या प्रकल्पाची उभारणी करू शकणार नाही.’ मात्र आता इराणने हे अणुप्रकल्प पुन्हा उभारण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.


