खळबळजनक माहिती उघडकीस; PM मोदींबाबतही मोठा दावा…
बांग्लादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता जाण्यामागे नेमका कुणाचा हात आहे, याचा खुलासा करणारी ही माहिती असून त्यामुळे देशातील राजकारणात पुन्हा वादळ उठले आहे.
शेख हसीना यांचा राजकीय काटा काढणारा व्यक्ती दुसरा-तिसरा कुणी नसून त्यांचाच विश्वासू असल्याची धक्कादायक माहिती आहे.
‘इंशाअल्लाह बांग्लादेश : द स्टोरी ऑफ अन अनफिनिश्ड रिव्हॉल्यूशन’ या पुस्तकामध्ये हा दावा करण्यात आला आहे. दीप हालदार, जयदीप मजूमदार आणि साहिदुल हसन खोकोन यांनी हे पुस्तक लिहिले असून प्रकाशनापूर्वीच त्यातील माहिती समोर आली आहे. या पुस्तकामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, शेख हसीना यांना त्यांचे नातेवाईक आणि सध्याचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उज-जमान यांनीच धोका देत सत्तेतून बेदखल केले.
माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांच्या हवाल्याने पुस्तकातून अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएनेच हा कट रचल्याचेही म्हटले आहे. शेख हसीना यांना सत्तेतून हद्दपार करण्याचा हा एक परफेक्ट CIA प्लॅन होता. सीआयएने वाकर यांना आपल्या जाळ्यात अडकविल्याचे आम्हाला समजलेच नाही. लष्करप्रमुखांनीच षडयंत्र रचल्याबाबत आमची गुप्तचर यंत्रणाही हसीना यांना सतर्क करू शकली नाही, असे कमाल यांच्या हवाल्याने पुस्तकात दावा करण्यात आला आहे.
कमाल यांनी म्हटल्याप्रमाणे, दक्षिण आशियातील कणखर नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि हसीना यांना कमकुवत करण्याचा अमेरिकेचे हेतू होता. आपले हित जपण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले, असे मोठा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे. या षडयंत्रमागे सेंट मार्टिन द्वीपचे महत्व मानले जात आहे. सत्ता जाण्याआधी हसीना यांनीही याबाबत मोठा दावा केला होता. हे द्वीप मी अमेरिकेला दिले तर माझे सरकार वाचेल. पण हा देशाच्या संप्रभुतेशी समझोता होईल, असे हसीना म्हणाल्या होत्या.
वाकर-उज-जमान यांनी जून 2024 मध्ये लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर 5 ऑगस्टला हसीना यांना देशातू पलायन करावे लागले. हे वाकर यांचे पहिले सिक्रेट मिशन होते. ज्यांनी त्यांना लष्करप्रमुख केले, त्यांनाच सत्तेतून घालविणे, हा त्यांचा हेतू होता, असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.


