मंत्र्यांचाही समावेश; राजकारणात खळबळ !
महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्याभोवती नेहमी चर्चेत असतं, त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांनी प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं सांगत थेट वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढच्या वर्षीच भेटणार असल्याचं म्हटल्यानं खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांनंतर (Sanjay Raut) पुढच्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातल्या एकापाठोपाठ अशा दोन फायरब्रँड नेत्यांच्या आजारांनी डोकं वर काढल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आल्याचं समोर आलं आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी(ता.3 नोव्हेंबर) त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्री भुजबळ यांनी उपस्थित होते. मात्र,मंत्रालयातील कामकाज आटोपल्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या कार्यालयानं भुजबळांची प्रकृती स्थिर असल्याचं कळवलं होतं. पण आता त्यानंतर आज भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचं समोर येत आहे.
यानंतर आता अमरावतीच्या माजी खासदार व भाजपच्या झुंजार नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा यांच्या पायाला इजा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर ही शस्त्रक्रिया केली जात आहे.पण या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना 25 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
भाजपकडून अमरावती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या काळात त्यांनी प्रचाराचा धडाकाच लावला होता. पायाला भिंगरी लावल्यागत त्यांनी अख्खा अमरावती लोकसभा मतदारसंघ पायाखाली घातला होता. याच प्रचारावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. अशा अवस्थेत त्यांनी प्रचार सुरूच ठेवला होता.
पण लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. एवढंच नव्हे तर,त्यांनी विधानसभा निवडणुकीतही प्रचाराची धुरा सांभाळली होती. पण त्यांनी आपल्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले होते. त्यांनी योग्य ते उपचार घेतले नाहीत. त्यामुळे त्यांचे पायाचे दुखणे वाढले. अखेर हे वेदना सहन न होऊ लागल्यानं त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या प्रकृतीबाबत एका जाहीर निवेदनाद्वारे माहिती दिली होती. त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं की,
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र!
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन.
वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे.
मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
कळावे,


