8 व्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे विमान हवेत आहेत. नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. त्यांना मोठा बोनस, भत्ते, डीए मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांची पाचही बोटं येत्या तीन वर्षांत तुपात असतील. पण एका बातमीने कर्मचाऱ्यांचा रक्तदाब, (BP) वाढला आहे. त्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. काय आहे ती नवीन अपडेट, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवाला लागलाय घोर?
8 व्या वेतन आयोगासाठी सरकारने मंजुरी दिली. आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई या असतील. त्यांच्या मदतीसाठी दोन सदस्य ही असतील. पुलक घोष आणि पंकज जैन हे दोन सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. नवी दिल्लीत आयोगाचे मुख्यालय असेल. पुढील दीड वर्षात वेतन आयोगाला दिशा देण्याचे काम हे तिघे करतील. आयोग शिफारशी सादर करेल. त्याआधारे वेतन निश्चित होईल.
जसे काम, तसा दाम
खासगी क्षेत्रात कर्मचारी, कामगारांसाठी KRA ही पद्धत लागू आहे. कोणता कर्मचारी चांगले काम करतो, खास भूमिका बजावतो, त्याआधारे त्याची पगारवाढ होते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा असेच जसे काम, तसा दाम (Performance Based Pay) या संकल्पनेवर पगाराचे गणित असेल. कामकाजाच्या कामगिरीवर वेतन वाढ, भत्ते आणि अनुषांगिक लाभ देण्याविषयीचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
सरकारी काम आणि चार दिवस थांब असे चित्र बदलण्यासाठी मोठा बदल करण्यात येणार आहे. जो कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करेल. त्याला इतरांपेक्षा अधिक वेतनवाढ देण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आणि सरकारी नोकऱ्यांकडे प्रोफेशनल लोकांचा कल वाढवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो. सरकारी काम झटपट पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक विभागात एक हेल्थी कॉम्पिटिशन आणण्यासाठी या आयोगाचा मोठा हातभार लागणार आहे. सध्या सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कामकाजावर सर्वसामान्य नाराज आहेत. आता सर्वात अगोदर केंद्र सरकार ही नाराजी दूर करण्यासाठी आयोगाद्वारे पहिला प्रयोग करणार असल्याचे समोर येत आहे.
8 व्या वेतन आयोगातंर्गत किती पगार वाढ होईल हे फिटमेंट फॅक्टर आणि डीएवर आधारीत आहे. सातव्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. 8 व्या वेतन आयोगातंर्गत तो 2.86 इतका वाढेल. तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर डीए शुन्य होतो. सातव्या वेतन आयोगातंर्गत डीए 58 टक्के इतका आहे. 8 व्या वेतन आयोगात 7 व्या वेतन आयोगप्रमाणे किमान वेतन वाढ 18,000 रुपयांहून थेट 51,480 रुपये होण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युलात फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा ठरेल. याशिवाय डीए पण अंतर्भूत होईल. त्यावरून 8 व्या वेतन आयोगातंर्गत वेतन वाढ दिसून येईल
वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल. तर त्यांची क्रयशक्ती सुद्धा वाढेल. पण याचा राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, केंद्रीय विद्यापीठांवर आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे. कारण पगारातील ही सुधारणा केंद्र सरकारच्या निर्णयानुसार घेण्यात येते. वेतन आयोगाच्या शिफारशी या केंद्र सरकारला बंधनकारक नसतात.


