पार्थ पवार जमीन खरेदीप्रकरणी चक्रव्यूहात…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार एका जमीन खरेदी व्यवहारामुळे वादात सापडले आहेत. पार्थ यांच्या ‘अमेडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपये बाजारमुल्य असलेली महार वतनाची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत खरेदी केली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
विरोधकांनी या मुद्द्यावरून रान उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पार्थ यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पार्थ यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे.
जमीन खरेदीतील गैरप्रकार समोर आल्यानंतर दानवे यांनी अजित पवार यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. तसेच या जमीन खरेदी व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्यूटीही माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना याबाबत काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी अजित पवार यांच्या मुलासह सत्ताधाऱ्याचे दलाल खरेदी करत असल्याचा गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
दरम्यान, पुण्यच्या मोक्याच्या आणि उच्चभ्रू परिसरातील जमीन खरेदी व्यवहारामुळे अडचणीत आलेल्या पार्थ पवारांमुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे पार्थ पवारांवर नेम धरून अजित पवारांचा गेम नक्की कोण करतंय? अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.
महत्त्वाच्या दस्ताऐवजावर पार्थ पवारांची सही
या जमीन खरेदी प्रकरणात ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट पार्थ यांची सही असलेला महत्वाचा दस्तावेजच थेट माध्यमांसमोर मांडला. अंधारे यांनी या जमीन खरेदी प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्रे समोर आणली असून त्यावर पार्थ यांनी सही केल्याचे दिसत आहे. ही कागपत्र सादर करताना पार्थ यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुंद्रांक विभाग आणि पोलीस प्रयत्न करत आहेत का? एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरलेला असताना आणि विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ यांची सही आहे. हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ यांचे नाव घेणे यंत्रणांनी का टाळले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला
…तर त्यांच्या पिताश्रींचा राजीनामा घेऊ : अंधारे
त्या पुढे म्हणाल्या की, स्टॅम्प ड्यूटीपोटी २१ कोटींचा महसूल बुडवणे ही सरकारची फसवणूक आहे. गोरगरिबांनी सगळे कर भरायचे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना मोकाट सोडायचे हे वाईट आहे. पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेऊ. आम्ही भूमिका घेऊ तेव्हा सळो की पळो करुन सोडू. पुण्यामध्ये असा प्रकार कोणीही सहन करणार नाही. शेवटपर्यंत हा विषय नेऊ. गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हे केले आहे, त्यांच्या पिताश्रींचा राजीनामा घेण्यापर्यंत आम्हाला लढावे लागेल, असही अंधारे म्हणाल्या आहेत.
‘एफआयआर’ मध्येही स्कॅम : अंजली दमानिया
अशातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एफआयआर झाला, पण त्यातही स्कॅम झाला असे म्हटले आहे. मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी केलेला स्कॅम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पार्थ यांच्या व्यवहारात मोठी बनवाबनवी : एकनाथ खडसे
शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी आहे, हे आता तरी दिसत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने हा व्यवहार रद्द केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. हे प्रकरण अजित पवार यांच्या मुलाचे आहे. या प्रकरणात अजित पवार यांच्या मुलाचा प्रत्यक्ष संबंध येतो. त्यामुळे चौकशी समिती काय करेल, हे सांगता येत नाही. सरकारच सरकारच्या मुलाची चौकशी करेल आणि त्यातून काही तथ्य बाहेर येईल असे नाही, असे खडसे म्हणाले.
कुटुंबाचे संस्कार महत्त्वाचे : अण्णा हजारे
विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून मौनव्रत बाळगलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंत्र्यांची मुले अशी वागत असतील, तर मंत्र्यांचा दोष आहे. संस्कार महत्त्वाचे असतात. एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. पार्थ यांच्या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. असले प्रकार केवळ कारवाईने थांबणारे नाहीत. अशा प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष धोरणे आखली पाहिजेत, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
मास्टरमाइंड नक्की कोण?
या सर्व प्रकरणामध्ये काही नेत्यांकडून संशयाची सुई भाजपकडे वळवण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याचे प्रकरण उघड होताच ताताडीने मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली. तसेच, महसूलमंत्री बावनकुळे यांनीदेखील दखल घेत “माझ्याकडे तक्रार आली की मी लगेच कारवाई सुरू करणार” ,असे म्हटले. त्यानंतर २४ तासांत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे.
अशातच, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुण्यातील राजकीय परिस्थिती पाहता पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. जर स्वबळावर निवडणुका झाल्या, तर भाजपसमोर राष्ट्रवादीचे मोठे आव्हान असणार आहे.
तसेच, जय पवारदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी हा अजित पवारांचा राष्ट्रवादी हाच आहे. मग ती पुणे महापालिकेची निवडणूक असो पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षांनी जिंकल्याच आणि आता जिल्हा परिषद हे भाजपचं पुढचे लक्ष्य आहे. यासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे.
नुकताच केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा झाला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचना केल्या होत्या. त्यावेळी अमित शाहांनी भाजपला राजकीय कुबड्यांची गरज नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे भाजप येत्या काळात या विधानाची अंमलबजावणी करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे? विशेष म्हणजे या कुबड्या काढण्याची सुरूवात भाजपने अजितदादांच्या बालेकिल्ला असलेल्या पुण्यातून केल्याची चर्चा आहे. अजित पवारांना रोखण्यासाठी भाजपने पाच मातब्बर नेतेही मैदानात उतरवले आहे.
भाजपने संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर सोपवली आहे. त्यासाठी पुणे महापालिकेसाठी त्यांच्यासोबत गणेश बिडकर हे असणार आहेत, तर पिंपरी-चिंचवडसाठी आमदार शंकर जगतापा यांच्यावर जबाबदारी असणार आहे. तर मावळ भागातील निवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगेंवर असणार आहे. तसेच आमदार राहुल कुल यांच्यावर बारामतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी, काँग्रेसचे भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पार्थ पवारांच्या या जमीन गैरव्यवहाराच्या अडून भाजप आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट करण्याच्या तयारी असल्याचे दिसत आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही?,महसूल मंत्री बावनकुळेंचे स्पष्टीकरण
प्रथमिक चौकशीमध्ये जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे, लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाहत, त्या कंपनीचे कोण कोण भागिदार आहेत, हा कंपनीचा नियम वेगळा आहे. त्याची नोंदणी करताना रजिस्ट्रारसमोर कोण-कोण गेले होते, त्यांची नावे आमच्याकडे आहेत. त्या पत्रकावर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत, असे स्पष्टीकरण देत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही याची माहिती दिली. या प्रकरणी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल सादर करेल.


