हा गंभीर विषय…
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या अमेडिया एलएलपी कंपनीचे भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यासह आठ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तब्बल दोन दिवसांनी शरद पवार यांची याप्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे. अकोल्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना पार्थ पवार यांच्याबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले.
पार्थ पवार प्रकरणात राज्य सरकार त्यांना वाचवत आहे का? असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारने यावर चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालातून कोणत्या बाबी समोर येतात, ते पाहिले पाहिजे.
मुख्यमंत्रीच म्हणतात हा गंभीर विषय..
तसेच यानिमित्ताने अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला आहे का? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण हा गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जर मुख्यमंत्रीच हा गंभीर विषय असल्याचे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून त्याचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे.
पार्थ पवार प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी सौम्य भूमिका घेत त्यांची पाठराखण केली होती. याहीबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, त्यांचे (सुप्रिया सुळे) असे मत असू शकते.
कुटुंब नाही तर विचारधारा महत्त्वाची
कुटुंब प्रमुख म्हणून या प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, प्रशासन, राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
पार्थ पवार यांच्यावर विरोधकांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली होती. सदर प्रकरण समोर आल्यानंतर मी पार्थ पवारांना फोन करून याबद्दल विचारपूस केली होती, असे त्या म्हणाल्या. आत्या मी काहीही चूक केलेली नाही, असे उत्तर पार्थ पवार यांनी दिल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या होत्या, पार्थ पवारांचा या प्रकरणात काही संबंधच येत नाही. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा सांगितले की, या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. जर व्यवहारच होऊ शकत नसेल तर मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस कशी काय आली? मुद्रांक शुल्क किती असावे? यावरही एकमत नाही. या प्रकरणात गोलमाल दिसत आहे.


