नवले पुल अपघाताचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितला काटा आणणारा थरार…
पुणेकरांना सुन्न करणारी भीषण अपघाताची घटना नवले पुलावर घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक अनेकजण जखमी झाले आहेत.
वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी सायंकाळी मालवाहू ट्रकने आठ ते दहा वाहनांना धडक देऊन एका कारला जोरदार धडक दिली. ही कार फरफटत नेऊन पुढे आणखी एका ट्रकला धडक दिली. त्यातून हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघाताचा थरार प्रत्यक्षदर्शीनी सांगितला आहे.
दोन भल्या मोठ्या ट्रकमध्ये अडकलेल्या चारचाकी वाहनातून ‘वाचवा वाचवा’ असा आवाज येत होता. आत अडकलेल्या जखमी व्यक्ती सुटकेसाठी मदतीसाठी ओरडत होते अन् स्फोट झाला. आग भडकली असा या अपघाताचा थरार पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. नऱ्हे परिसरात राहणारे लौकिक गोळे चहा घेण्यासाठी वडगाव बुद्रुक परिसरात आले होते. त्यावेळी ही भीषण अपघाताची घटना घडली.
वाचवा वाचवा असा आवाज आला अन्…
‘मी चहा घेत असताना अचानक मोठा आवाज आला. घाबरून मागे वळून पाहिले असताना एक ट्रक नियंत्रण सुटलेल्या अवस्थेत उतारावरून भरधाव अनेक वाहनांना धडक देत चालला होता. त्याने एका चारचाकी गाडीला धडक दिली. त्या चारचाकीच्या समोर एक ट्रक होता. त्या ट्रकने ब्रेक दाबला. दोन्ही अवजड वाहनांमध्ये चारचाकी अडकली. त्यातून ‘वाचवा वाचवा’ असा आवाज येत असतानाच मोठा स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले.
या अपघाताच्या घटनेनंतर आम्ही घाबरून पळालो. त्याच वेळी एका कंपनीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन घरी निघाली होती. या बसमधील कर्मचाऱ्यांनी घाबरून बाहेर रस्त्यावर उडी घेतली. त्यांच्या मदतीने आम्ही बचाव कार्यास सरसावलो, असे लौकिक गोळे यांनी अपघाताबद्दल सांगितले.
अपघात कसा झाला?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 25 वाहनांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थान पासिंगचा मालाने भरलेला ट्रक साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघाला होता. नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ त्याचा ब्रेक फेल झाला असावा. त्यानंतर ट्रक पुढे कंटेनरला जाऊन धडकला. यामध्ये दोन कार होत्या, त्यापैकी एका कारचा स्फोट झाला आणि आग लागली.
सरकारकडून ५ लाखांची मदत
पुण्यातील नवले पुलावर सातत्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. अनेक मोठे अपघात या ठिकाणी घडल्याने नवले पूल डेथ झोन बनला असल्याचे बोलले जात आहे. या अपघाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यांनी एक्सवरून पोस्ट करत या दुर्देवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्राण गमावलेल्या व्यक्तींना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


