मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अजिंक्य नाईक यांची वर्णी लागली.
इतर उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने नाईक यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर बुधवारी उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि इतर पदांसाठी मतदान पार पडले. शरद पवार यांचे विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून अपेक्स कौन्सिलच्या सदस्यपदी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी वर्णी लागली आहे.
दरम्यान, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा पराभव केला. यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी आता डॉ. उन्मेश खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे. उन्मेश यांनी यावेळी शाहआलम शेख यांचा पराभव केला आहे. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. यामुळे त्यांच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष होते. मिलिंद नार्वेकर हे अपेक्स कौन्सिलच्या पदासाठी उभे होते. नार्वेकर यांना 241 मते मिळवत विजय मिळवला आहे. सहसचिव पदी निलेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. भोसले यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केलं आहे
अपेक्स कौन्सिलसाठी 9 सदस्य
अपेक्स कौन्सिलच्या सदस्यपदी संदिप विचारे, सुरज सामंत, विघ्नेश कदम, मिलिंद नार्वेकर, भूषण पाटील, नदीम मेमन, विकास रेपाले, प्रमोद यादव, निल सावंत या 9 सदस्यांची निवड झाली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निकाल
उपाध्यक्ष-जितेंद्र आव्हाड विजयी वि. नवीन शेट्टी
सचिव-उन्मेष खानविलकर विजयी वि. शाह आलम शेख
संयुक्त सचिव-निलेश भोसले विजयी वि. गौरव पय्याडे
खजिनदार-अरमान मलिक विजयी वि. सुरेंद्र शेवाळे
हा विजय संपूर्ण मुंबई क्रिकेट परिवाराचा आहे, आपल्या शहराच्या क्रिकेट परंपरेचा अभिमान आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि शरद पवारजी यांच्या मजबूत पाठिंब्यामुळेच हा यशाचा प्रवास शक्य झाला. तसेच आशिषजी शेलार यांच्या सततच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाबद्दल आभार.


