अवघ्या एकाच षटकात ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा…
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत ‘अ’आणि यूएई यांच्यातील सामन्यात भारतीय युवा फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज शतक झळकावले, तर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या जितेश शर्माने शानदार अर्धशतक झळकावले.
या दोघांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे भारतीय संघ २९७ धावांचा मोठा स्कोर उभारण्यात यशस्वी झाला.
जितेश शर्माने एकाच षटकात कुटल्या २८ धावा –
यूएईकडून १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुहम्मद इरफान याची लय पूर्णपणे बिघडलेली दिसली. जितेश शर्माने त्याच्या या षटकात अक्षरशः धुलाई केली. इरफानच्या या षटकात जितेशने तीन षटकार आणि दोन चौकार मारत एकूण २६ धावा वसूल केल्या. इरफानने दोन वाईड चेंडू टाकल्याने या षटकात एकूण २८ धावा जमा झाल्या.
वैभव आणि जितेशची आतिषबाजी –
भारताकडून वैभव सूर्यवंशी ने पुन्हा एकदा वादळी फलंदाजी केली. त्याने फक्त ४२ चेंडूंमध्ये १४४ धावांची अविश्वसनीय खेळी केली, ज्यात त्याने ११ चौकार आणि तब्बल १५ षटकार मारले. त्यानंतर जितेश शर्मा नेही तितक्याच धमाकेदार अंदाजात धावा कुटल्या आणि यूएईच्या गोलंदाजांना अजिबात उसंत दिली नाही.
-जितेशने ३२ चेंडूंमध्ये ८३ धावा केल्या.
या खेळीत त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले.
त्याचा स्ट्राईक रेट २५९.३८ इतका जबरदस्त होता.
यूएईचे गोलंदाज भारतीय फलंदाजांपुढे ठरले निष्प्रभ
या दोघांच्या विस्फोटक खेळीमुळे आणि नमन धीरच्या ३४ धावांच्या योगदानामुळे भारत ‘अ’ संघाने २९७ धावांचा ‘हिमालय’ गाठला. या सामन्यात यूएईचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. मुहम्मद फजहरुद्दीन, आर्यन खान आणि मुहम्मद अरफान यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली, त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही गोलंदाजाला यश मिळू शकले नाही.
जितेश शर्माचा आंतरराष्ट्रीय अनुभव आला कामी –
जितेश शर्माने २०२३ मध्ये भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १२ टी-२० सामन्यांत १२५ धावा केल्या आहेत. मिळालेल्या संधीचे त्याने पुरेपूर सोने केले असून या स्पर्धेतही तो लयीत दिसत आहे.


