डोनाल्ड ट्रम्प संतापले; या देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलटसुलट निर्णयांमुळे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग ढवळून निघत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतासह अनेक देशांना बसला आहे.
दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योग जगत आणि नागरिकांनाच चार शब्द सुनावले आहेत. चिप निर्मितीवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योग जगतावर नाराजी व्यक्त केली. तसेच एच-१बी व्हिसा घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं समर्थन करताना मेरिकन लोकांना मायक्रोचिप बनवता येत नाही, असे सांगितले.
अमेरिका आपल्या देशांतर्गत सेमीकंडक्टर चिपच्या पुनर्निर्मितीचा प्रयत्न करत असतानाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘अमेरिकन कर्मचाऱ्यांमध्ये सेमीकंडक्टर निर्मितीसाठा लागणाऱ्या आवश्यक तांत्रिक कौशल्याचा अभाव आहे. खरंतर हा एक महत्त्वपूर्ण उद्योग आहे. येत्या काळात या उद्योगात अमेरिका व्यापक पातळीवर पुनरागमन करेलट, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.
अमेरिका आता अधिक चिप निर्मिती करत नाही. मात्र जर तुम्हाला चिप बनवायच्या असतील, तर आपल्याला आपल्या लोकांना चिप निर्मितीचं प्रशिक्षण द्यावं लागेल. त्याचं कारण म्हणजे आपण आपला चिपचा व्यवसाय मूर्खपणा करून तैवानच्या हातात दिला आहे, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२२ साली आणलेला चिप्स अॅक्ट फेटाळून लावताना हा चिप्स अॅक्ट म्हणजे एक संकट होते, असे सांगितले. आता सर्व चिप निर्मिती करणाऱ्या कंपन्या परत येत आहेत. तसेच आता जगातील बहुतांस चिप निर्मिती ही अमेरिकेतच होईल, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.


