ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण !
दिल्लीमधील लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए, स्थानिक पोलिसांकडून धरपकड सुरूच आहे. स्फोटातील मयत आरोपी उमर नबी याचा एक स्फोटापूर्वीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओबद्दल भूमिका मांडत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना काही सवाल केले आहेत.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील मयत दहशतवाद्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आत्मघाती कृत्य हे हौतात्म्य असल्याचे तो म्हणत आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आत्मघात म्हणजे हौतात्म हा गैरसमज असून, इस्लाममध्ये याला मज्जाव केलेला आहे. त्याचबरोबर निष्पापांना मारणे हे पाप आहे, असेही ओवेसी म्हणाले आहेत.
ओवेसी म्हणाले, हा दहशतवादच आहे, दुसर काहीही नाही’
असदुद्दीन ओवेसी यांनी एक पोस्ट केली आहे, ते म्हणाले, दिल्ली स्फोटातील आरोपी उमर नबी याचा एक व्हिडिओ आहे, ज्यात तो आत्मघाती हल्ल्याचे समर्थन हौतात्म्य म्हणून करत आहे आणि हा प्रकार एक गैरसमज आहे. इस्लाममध्ये आत्महत्या हराम (निषिद्ध) मानले गेले आहे आणि निष्पाप लोकांना मारणे हे गंभीर पापच आहे. असे कृत्य देशाच्या कायद्याच्याही विरोधात आहे. हा कोणत्याही प्रकारची चुकीची समजूत नाही. हा दहशतवादच आहे आणि दुसरे काहीच नाही.
ओवेसींचा अमित शाहांना उलट सवाल
खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांच्याच जुन्या विधानाचा दाखल देत काही सवाल केले आहेत. ओवेसी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर आणि महादेव दरम्यान अमित शाह यांनी संसदेत ठामपणे सांगितले होते की, गेल्या सहा महिन्यांत एकही स्थानिक काश्मिरी तरुण दहशतवादी संघटनांशी जोडला गेलेला नाही. मग हा ग्रुप कुठून आला? हा ग्रुप शोधण्यात आलेल्या अपयशासाठी कोण जबाबदार आहे? असे प्रश्न खासदार ओवेसींनी उपस्थित करत शाहांना घेरलं आहे.
उमर नबीने भावाला दिला होता मोबाईल
पीटीआयने अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहिती आधारे दिलेल्या उमर नबी दिल्लीत स्फोट घडवण्यापूर्वी काश्मीरमध्ये गेला होता. त्याने त्याचा मोबाईल त्याच्या भावाला दिला होता.
अधिकाऱ्यांनी उमरचा भाऊ जहूर इलाही याला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करण्यात आली, पण त्याने सुरुवातीला आपल्याला उमर नबीबद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी त्याला दम देताच त्याने सगळी माहिती दिली. उमरने जहूरला मोबाईल दिला होता आणि त्याला कडक शब्दात समजावून सांगितले होते की, माझ्याबद्दल काही बातमी आली तर हा मोबाईल पाण्यात टाकून नष्ट कर.


