सरपंच श्री. रविंद्र सिताराम भोईर यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी – विकी जाधव
कल्याण (वसत–शेळवली), दि. 19 :
वसत–शेळवली ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी सुमारे १०:०० वाजताच्या सुमारास नाळिंबी – वसत रोड परिसरात बिबट्यांची एक जोडी दर्शनास आली. ही घटना स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहताच ग्रामपंचायत प्रशासनाला तात्काळ कळविण्यात आली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बिबट्यांची हालचाल रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये आणि ओसाड भागात काही वेळ दिसून आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सरपंच श्री. रविंद्र सिताराम भोईर यांचे आवाहन — “नागरिकांनी जागरूक राहावे”
वसत–शेळवली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रविंद्र सिताराम भोईर यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांनी पुढील सूचना पाळण्याचे आवर्जून सांगितले :
अनावश्यकपणे रस्त्याच्या कडेला किंवा झुडपांच्या भागात गर्दी करू नये
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा एकटे जाणे टाळावे
लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी
पाळीव प्राणी घराजवळ सुरक्षित ठेवावेत
बिबट्यांची कोणतीही हालचाल दिसताच त्वरित वनविभाग किंवा ग्रामपंचायत वसत–शेळवली यांच्याशी संपर्क साधावा
सरपंच भोईर म्हणाले, “वनविभागाशी संपर्क साधला असून सर्व्हे तसेच गस्त पथक तातडीने सक्रिय केले आहे. नागरिकांनी कोणतीही घाबराट न करता आवश्यक ती काळजी घ्यावी.”
घटनास्थळाचा व्हिडिओ उपलब्ध — वनविभागाचे अधिकारी यांच्या कडून पाहणी
बिबट्यांचे दर्शन होत असताना गाडीवरून घेतलेला व्हिडिओ नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी केली असल्याची माहिती सरपंच श्री. रविंद्र सिताराम भोईर यांनी दिली आहे.



