दादा भुसे यांची भविष्यवाणी !
नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांना सुरुवात झाली आहे. नंदुरबारमधील दीनदयाळ चौकात बुधवारी सकाळी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली.
मंत्री दादा भुसे यांनी नंदुरबार नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यकाराची गरज नसल्याचे म्हटले. यापुर्वी नंदुरबारचा चांगला विकास चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे सांगत पुढेही शहराचा विकास साधायचा असेल तर नगर विकास खातेच एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेनेकडेच सत्ता देण्याची मागणी केली. एकनाथ शिंदे यांच्या सारखा अद्वितीय मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहीला नाही. उपमुख्यमंत्री अजित दादा देखील महाराष्ट्रात इतक्या स्वाक्षरी करणारा मुख्यमंत्री आपण पाहीलेला नाही, असे कौतुक शिंदे यांचे करतात.
आजही जनतेला तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण, असे विचारले तर जनता एकनाथ शिंदे यांचे नाव घेईल. भविष्यात या राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करतांना आपण पाहणार आहोत, अशी भविष्यवाणी दादा भुसे यांनी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भुसे यांनी राज्यात कुठलीही शाळा बंद होणार नतसून सर्व विद्यार्थ्यांची व्यक्तिगत काळजी घेतली जात असल्याचे नमूद केले.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी, नंदुरबारमध्ये ८५ कोटींचा निधी हा नगर विकास विभागाच्या माध्यमातून डीपी रोडसाठी मिळाल्याचे सांगत राज्यात मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त योजना आणल्या असतील तर त्यांचे नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे, असे नमूद केले. लाडक्या बहिणींची योजना बंद होईल, असा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे.
मात्र ही योजना कधीही बंद होणार नाही, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. आजही एकनाथ शिंदे साहेब रोज आठ सभा घेत आहेत. लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदे आहे दुसरा कोणीही नाही. आता तीन तीन भाऊ झाले आहेत. जेव्हा ही योजना लागू झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होते, असा उल्लेख देखील भाषणातून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी तळागाळापर्यतच्या लोकांसाठी आणलेल्या योजनांमुळे अनेक नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसेल हा विश्वास, श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. विरोधी पक्षांची विधानसभेत काय परिस्थिती झाली, हे आपण पाहीले आहे, त्यामुळे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.
राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एक आचारसंहिता घालून घेतली आहे. कोणावरही टिका करायची नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. कुठे नगराध्यक्ष भाजपचा, कुठे शिवसेनेचा तर कुठे राष्ट्रवादीचा होईल. मात्र तो महायुतीचाच होईल, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.


