शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी !
राज्यभरात सध्या अनेक युत्या होत आहेत. मात्र, कुर्डूवाडीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेली आमची युती महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी देखील ठरू शकते, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
कुर्डूवाडी नगरपालिकेच्या प्रचारासाठी आले असता शिंदे यांनी केलेले वक्तव्य महायुती धोक्यात येण्याचे संकेत ठरू शकतात.
महाराष्ट्रात अनेक निवडणुका चालू आहे. मात्र सोलापूरच्या निवडणुकांमध्ये दररोजमोठ्याघडामोडीघडत आहेत, असे सांगत अनगर सांगोला अशा नगरपालिकेतील भाजपच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे शिंदे यांनी निशाणा साधला. या सगळ्या घडामोडींवर सगळ्यांचे लक्ष आहे, असे सांगताना काही लोक हे फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात. असे सांगत भाजपला थेट टोला लगावला.
एकनाथ शिंदे यांचा केवळ वापर करून घेतलाय
एकनाथ शिंदे यांचा केवळ वापर करून घेतल्याचा सूचक इशारा देताना आपण सर्व साधी माणसं आहोत, असे सांगत एकनाथ शिंदे यांचा फक्त वापर झाल्याचे सूचक वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केले. आपण सर्व साधी माणसे आहोत. पण लढणारी माणसे कधीच शरणागती घेत नसतात, असेही शिंदे यांनी सांगितले. कुर्डूवाडी येथे झालेली युती ही भविष्यातील नांदी सुद्धा असू शकेल, असे सांगत भविष्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत त्यांनीयावेळी दिले.
नवीन समीकरणाचे संकेत, मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता
सध्या रोज भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादावादीतून राज्यातील नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदे गटाने भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची आघाडी केल्याचे चित्र आहे. अशाच पद्धतीने भाजपनेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कुर्डूवाडी येथे झालेल्या शिंदे सेना आणि शरद पवार गट यांच्या युतीवरून बोलताना हे मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे आता राज्यात नवीन समीकरणाचे संकेत शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिल्याने महायुतीत येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी आणि भूकंप होण्याची शक्यता आहे.
सध्या, कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची युती झालेली आहे. या पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष शिंदेनी हे राजकीय वक्तव्य केलंय.


