ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
ठाणे, (जिल्हा परिषद, ठाणे) – सार्वजनिक प्राधिकरणातील जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींबाबत जिल्हा परिषद, ठाणे ग्रामपंचायत विभाग अंतर्गत अधिकाऱ्यांना सुस्पष्ट व अद्ययावत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद, ठाणे येथील बी. जे. हायस्कूल येथे हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. सदर प्रशिक्षण कार्यक्रम दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणास भिवंडी, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रकल्प संचालक पंडित राठोड, गटविकास अधिकारी भिवंडी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अंबरनाथ निता खोटरे तसेच विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये यशदामार्फत तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून सूत्रसंचालक दादू बुळे, तज्ञ प्रशिक्षक (माहिती अधिकार) रेखा साळुंखे यांनी माहिती अधिकार कायद्यातील कलमे, वेळापत्रक, अपील प्रक्रिया, निर्णय लेखन, तसेच प्रत्यक्ष प्रकरणांवरील मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान माहिती अधिकार कायद्याच्या अचूक अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या, कायदेशीर बाबी, चुका टाळण्यासाठीचे उपाय आणि पारदर्शक प्रशासनाचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणार्थींनी शंका विचारून समाधानकारक उत्तरे मिळाल्याचे मत व्यक्त केले.
सदर प्रशिक्षणामुळे जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्यांचे ज्ञान व आत्मविश्वास वाढून, भविष्यात माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
“माहिती अधिकार कायदा हा पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाचा कणा आहे. जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्यांना या कायद्याची सखोल समज असणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे प्रशिक्षण केवळ औपचारिक नसून प्रत्यक्ष कामात उपयोगी ठरेल असे असून, यामुळे माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी निश्चितच साध्य होईल.” – प्रकल्प संचालक पंडित राठोड
“या प्रशिक्षणातून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी, वेळेचे बंधन आणि निर्णय प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळाली. प्रत्यक्ष उदाहरणांमुळे कायदा समजणे सोपे झाले असून, पुढील काळात माहिती अर्ज व अपीलांवर अधिक योग्य व वेळेत कार्यवाही करता येईल, असा आत्मविश्वास आम्हाला मिळाला आहे.” – प्रशिक्षणार्थी ग्रामपंचायत अधिकारी भिवंडी गणेश पडवळ

