दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
तालुक्यातील केहाळ वडगाव येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. “गाव तिथे शाखा” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. शाखेचे उद्घाटन मंठा तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखेच्या उद्घाटनानंतर परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे म्हणाले की “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम म्हणजे गावागावात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार आहे. केहाळ वडगाव ही शाखा स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल. शेतकरी, तरुण, महिला आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध राहील,” असे ते म्हणाले.तसेच पुढे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की,
“संघटन मजबूत असेल तरच विकासाला गती मिळते. प्रत्येक शिवसैनिकाने गावाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी प्रामाणिकपणे काम करावे.”
त्यांच्या भाषणास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास उपतालुकाप्रमुख रामराव वरकड, उपतालुकाप्रमुख अक्षयदीप वाघमारे, युवासेना तालुकाप्रमुख दीपक गायकवाड, दलित आघाडी तालुका प्रमुख दिलीपराव हिवाळे, युवासेना उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, युवासेना शहरप्रमुख ॲड. राजेश खरात, शिवसेना उपशहरप्रमुख बंडू नाना बोराडे, शिवसैनिक भगवानराव गायकवाड, पप्पू बोराडे तसेच नवनियुक्त शाखा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून संघटन बळकटी, गावातील मूलभूत सुविधा, युवकांना संधी आणि सामाजिक एकात्मता यावर भर देत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नवीन शाखेमुळे केहाळ वडगाव परिसरातील स्थानिक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाणार असून संघटनात्मक कामाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गावातील पाणी, रस्ते, वीज, शिक्षण आणि रोजगार या विषयांवर सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि शाखा परिसरात एकोप्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
