पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी
पालघर : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्यपूर्ण आणि परिणामकारक कामगिरी करत पालघर तालुक्यातील नावझे ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायतीला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता अभियान, कचरा व्यवस्थापन आणि विविध हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी ही नावझे ग्रामपंचायतीच्या यशामागील प्रमुख कारणे ठरली. पर्यावरण संवर्धन ही केवळ मोहीम न राहता ती लोकचळवळ व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायतीने गणेशोत्सव, क्रिकेट स्पर्धा तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली. पर्यावरणाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला.
नियोजनबद्ध कार्यपद्धती, काटेकोर अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळेच ही यशोगाथा साकार झाली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीचा हा परिपाक मानला जात आहे.
या यशाचे श्रेय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या मार्गदर्शन व परिश्रमांना दिले जात आहे.
नावझे ग्रामपंचायतीची ही कामगिरी केवळ गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण पालघर तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श निर्माण करत नावझेने राज्यपातळीवर आपला ठसा उमटविला आहे.
सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
