मंडणगड तालुका प्रतिनिधी उमेश तबीब
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकरी व आंबा विक्रेत्यांच्या विविध मागण्यांबाबत ‘सुरुची’ ‘ येथे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री माननीय श्री भरतशेठ भोगावले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय नामदार योगेश दादा कदम यांच्या समवेत संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आंबा उत्पादनातील घट, बदलते हवामान, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, रोगांचा वाढता प्रादुर्भाव, बाजारभावातील घसरण तसेच ‘रत्नागिरी हापूस’ नावाने इतर राज्यांतील आंब्याची विक्री यामुळे स्थानिक बागायतदारांचे होत असलेले नुकसान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी व विक्रेत्यांनी कर्जमुक्ती, तात्काळ पंचनामे, नुकसानभरपाई, आंबा पिकासाठी स्वतंत्र संशोधन व प्रभावी औषधनिर्मिती यांसारख्या मागण्या मांडल्या.
बैठकीस बाणकोट येथील बागायतदार श्री मिर्झा इसाक नाडकर, इस्माईल बद्रुद्दीन उंडरे, फैसल शकील परकार, नावेद खान महंमद खान साखरकर, आनंद दिवाकर भाटे, खलील अलीमिया तलकर, अकबर अलीमिया करेल, लियाकत इसाक अजवाने, मकसूद बद्रुद्दीन उंडरे, आसिफ अहमद मुल्ला, बद्रुद्दीन इस्माईल उंडरे, आवेश मिर्झा नाडकर, आसिफ दादरकर तसेच पत्रकार उमेश तबीब उपस्थित होते.
माननीय गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी बागायतदारांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, तर मंत्री श्री भोगावले यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका व्यक्त केली. या बैठकीमुळे मंडणगड तालुक्यातील आंबा उत्पादक व विक्रेत्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
