पालघर प्रतिनिधी:- मिलिंद चुरी
पालघर:- महा आवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत पालघर जिल्ह्याने सलग तीन वर्षे विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवत यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. २५ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील सिडको भवनात झालेल्या कोकण विभागीय पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
सन २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात तृतीय क्रमांक, तर राज्य पुरस्कृत आवास योजना गटात द्वितीय क्रमांक मिळवत पालघरने सुरुवातच दणदणीत केली. पुढील वर्षी (२०२२-२३) राज्य पुरस्कृत आवास योजनेत तृतीय क्रमांक पटकावत सातत्य सिद्ध केले.
मात्र २०२३-२४ हे वर्ष पालघरकरांसाठी ऐतिहासिक ठरले. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्ह्याने विभागात अव्वल स्थान पटकावले. पंचायत समिती गटात विक्रमगड प्रथम, वाडा द्वितीय आणि पालघर तृतीय क्रमांकावर राहिले. ग्रामपंचायत गटात मोज (ता. वाडा) प्रथम तर खुडेद (ता. विक्रमगड) द्वितीय ठरली. राज्य पुरस्कृत आवास योजना गटातही जिल्हा परिषद पालघरने प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले; पंचायत समिती वाडानेही प्रथम क्रमांक पटकावला.
याशिवाय वाळू उपलब्धता गटात जव्हारचे तहसीलदार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. उद्दिष्टपूर्ती, गतीमान अंमलबजावणी आणि गुणवत्तेचा आग्रह यामुळे पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनाही विभागीय मानांकन मिळाले.
या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, भानुदास पालवे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारले. अतिरिक्त आयुक्त (विकास) डॉ. माणिक दिवे, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. राजाराम दिघे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदीप घोरपडे आणि वक्ते प्रशांत देशमुख यांची उपस्थिती लक्षणीय होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले, “ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना सन्मानाने निवारा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. नियोजनबद्ध अंमलबजावणी, सातत्यपूर्ण आढावा आणि तळागाळातील समन्वयामुळे हे यश शक्य झाले.” अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही संघभावना आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सलग तीन वर्षांच्या या कामगिरीमुळे कोकण विभागात पालघर जिल्ह्याची ओळख अधिक ठळक झाली असून जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातील सन्माननीय निवाऱ्याचे स्वप्न साकार करत पालघरने विकासाच्या वाटेवर आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे.
