प्रतिनिधी /स्वाती हडकर
हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस संघटनाबांधणीसाठी व्यापक मोहीम सुरू केल्याची माहिती दिली.
कोकणातून प्रशिक्षण शृंखलेची सुरुवात
महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शृंखला सुरू करण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले. “या शृंखलेची सुरुवात कोकणातून केली आहे. संघटना बांधण्याच्या माध्यमातून आम्ही पुढे निघालो आहोत. आगामी काळात काँग्रेस वैचारिक लढाई लढणार असून संघटनाबांधणीवर विशेष भर दिला जाणार आहे,” असे ते म्हणाले.
केजरीवाल निकालावर टीका
अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोषत्वाच्या संदर्भात लोकशाही कशी डुबवली गेली, याचे हे उदाहरण असल्याची टीका सपकाळ यांनी सरकारवर केली. तसेच राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार द्यावा, अशी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना विनंती त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावे, असा आमचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार मृत्यू प्रकरणावर प्रश्नचिन्ह
अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाबाबतही सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. “साधा अपघात झाला तरी गुन्हे दाखल होतात. मात्र एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघातानंतरही गुन्हे दाखल होत नाहीत, ही बाब संतापजनक आहे,” असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी तपासासाठी पत्र दिले असले तरी तपास यंत्रणांकडून अपेक्षित गती दिसून येत नाही. अपघाताचे कारण स्पष्ट करणारा वस्तुनिष्ठ अहवाल सरकारने जाहीर करावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली
