दैनिक चालू वार्ता – शिरूर प्रतिनिधी इंद्रभान ओव्हाळ
“सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत व्हॉट्सॲप द्वारे नोंदवली तक्रार – अभियंत्यांकडून त्वरित कार्यवाहीचे आश्वासन- योग्य पूर्तता होणार? याकडे लक्ष.
(शिरूर ) अन्नापुर येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन आरोग्य उपकेंद्रासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ₹६३,१०,७२०/- तर स्वीकृत रक्कम ₹५३,७६,७३४/- आहे. सदर कामाची मुदत २७/०५/२०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.
मात्र आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निकृष्ट सिमेंट विटा भुसभुशीत व तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या असून, कृत्रिम वाळू व इतर साहित्याचाही दर्जा संशयास्पद भासत आहे. आरोग्य सेवेच्या अत्यंत महत्त्वाच्या इमारतीत अशा प्रकारे काम होत असल्यास भविष्यात संरचनात्मक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
याहूनही गंभीर बाब म्हणजे शासन निर्देशांनुसारच कामाच्या ठिकाणी कामांची माहिती दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असताना, तसे आढळून येत नाही. याउलट मात्र लोकप्रतिनिधीचे फोटो लावलेले फलक मात्र आढळतात हे अत्यंत दुर्दैवी आहे, जनतेच्या करातून होणाऱ्या कामात ही जाहिरातबाजी कशासाठी?? शासन निर्देश पायदळी तुडवत असे फलक लावून संबंधित नक्की अधिकारी काय दर्शवू पाहतायत? असा सवाल वाळुंज यांनी उपस्थित केला आहे.
*जनतेपासून पारदर्शकता का लपवली जात आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.*
*“उपस्थित होणारे गंभीर प्रश्न:-*
• निकृष्ट साहित्य वापरण्याचे धाडस ठेकेदार करतातच कसे?
• संबंधित अधिकाऱ्यांची देखरेख नेमकी कुठे आहे?
• माहिती फलक का नाही? फलकावर लावलेले फोटो नक्की कशासाठी?
• ₹५३ लाखांच्या निधीचा योग्य वापर होणार आहे का?
*➡️ तक्रारीनंतर योग्य प्रतिसाद अभियंता श्री. तुमसरे यांचे आश्वासन*
तक्रारीची दखल घेत संबंधित अभियंता श्री. तुमसरे यांनी सिमेंट विटा हटवून माती विटांचा वापर करण्यात येईल तसेच इतर साहित्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
“ मात्र आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, याकडे जनतेचे लक्ष राहणार आहे.
➡️ पंचायत समिती शिरूर गट विकास अधिकारी गांभीर्याने लक्ष देणार?
गटविकास अधिकारी यांनी एसी कार्यालयापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सार्वजनिक कामांची गांभीर्याने दखल घ्यावी अशी जागरूक नागरिकांची मागणी आहे..
जनतेच्या कररुपी पैशातून उभारल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. लोकशाहीत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि मानवी हक्कांचे संरक्षण आवश्यक आहे.प्रत्येक सार्वजनिक कामांबाबत नागरिकांनी जागरूक राहिलेच पाहिजे, ही कामे कोणाच्या वयक्तिक खिशातून नाही तर जनतेच्या पैशातून केली जातात आणि लोकशाही देशात जनता मालक आहे,त्यामुळे कटाक्षाने लक्ष ठेवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.
✍🏻 निलेश वाळुंज
सामाजिक कार्यकर्ता
