बारामती विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर वेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी (ता.5) राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून सहा तास चौकशी करण्यात आली.
विमानातील तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन आणि अपघातांशी संबंधित मुद्द्याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आल्याची माहिती सीआयडीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
बारामती येथे 28 जानेवारी रोजी सकाळी भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे.
या अपघाताशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे सीआयडीने जमा केले आहेत. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) चा प्राथमिक अहवाल नुकताच सीआयडीकडे प्राप्त झाला आहे. या अहवालातील मुद्यांचाही आधार घेतला जात आहे.
तपासाच्या अनुषंगाने व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. ते आज सकाळी अकराच्या सुमारास पाषाणमधील सीआयडी कार्यालयात त्यांचा मुलगा रोहित सिंग यांच्यासह आले होते. या वेळी व्ही. के. सिंग यांच्याकडे अपघाताबाबत चौकशी करण्यात आली, अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
व्हीएसआर वेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची तपास अधिकाऱ्यांकडून सहा तास चौकशी करण्यात आली. विमान अपघाताच्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यांना पुन्हा लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
– सुनील रामानंद, अतिरिक्त पोलिस महासंचालक, सीआयडी.
