अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरू आहे. यादरम्यान इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर (IRGC)ने मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले.
आयआरजीसीने युद्धाचा शेवट आम्ही ठरवू असे अमेरिकेला सुनावले आहे. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या ऊर्जा केंद्रांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे हा संघर्ष अधिकच भडकण्याची चिन्हे आहेत.
इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरच्या प्रवक्त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधान निरर्थक असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत. जर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले असेच सुरू राहिले, तर या प्रदेशातून एक लिटरही तेल साठाही निर्यात होऊ देणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. प्रादेशिक सुरक्षा ही एकतर सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीच नसेल असेही त्यांनी स्पष्ट कले. तसेच प्रवक्त्याने म्हटले की, जर तणाव अधिक वाढला, तर त्याचा परिणाम आखाती देशांमधून हेणाऱ्या तेल वाहतुकीवर होईल.
ट्रम्प यांनी यापूर्वी इशारा दिला होता की, जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणारी तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पूर्वीपेक्षा २० पट अधिक तीव्र प्रतिसाद देईल. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटले होते की, सहज उद्ध्वस्त करता येणार्या ठिकाणांना लक्ष्य करेल, ज्यामुळे इराणला देश म्हणून उभे राहणे अक्षरशः अशक्य होऊन जाईल. अशी वेळ येऊ नये अशी आपण आशा व्यक्त करतो असेही ट्रम्प म्हणाले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणमधील लष्करी मोहिमेबाबत माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की, इराणमधील अमेरिकेची लष्करी मोहीम मूळ नियोजित वेळेच्या खूप पुढे असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. आतापर्यंत राबवलेली ही मोहीम पूर्णपणे यशस्वी मानली जाऊ शकते, तसेच ही कारवाई सुरूच राहिल असेही ट्रम्प म्हणाले. अमेरिकन लष्कराने इराणच्या ड्रोन उत्पादन केंद्रांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून या हल्ल्यांमुळे इराणकडून होणाऱ्या ड्रोन लाँचिंगमध्ये ८३ टक्क्यांनी घट झाल्याचेही ट्रम्प म्हणाले.
तेहरानमधील तेल डेपोंवर हल्ले
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या फ्युल पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यानंतर इराणकडून हे वक्तव्य करण्यात आले आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तेहरान आणि त्याच्या शेजारच्या अल्बोर्झ प्रांतातील तेल डेपोंना शनिवारी संध्याकाळी लक्ष करण्यात आले, ज्यामुळे रविवारी इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण आग आणि धुराचे लोट पाहायला मिळाले.
इराणकडून दीर्घ संघर्षाची तयारी
इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की देश दीर्घ संघर्षासाठी तयार आहे. आयआरजीसी प्रवक्त्याने सांगितले की, प्रवक्त्याने सांगितले की, इराणने बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लढाऊ जहाजांचा मोठा साठा करून ठेवला आहे. इराण किमान सहा महिने सलग तीव्रतेने लढा देऊ शकतो. येणाऱ्या काही दिवसांत इराण युद्धाची नवी रणनीती वापरणार असून, अधिक प्रगत आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमधील १३३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९६६९ नागरी इमारतींचे नुकसान झाले आहे, यामध्ये हजारो व्यावसायिक इमारती आणि घरांचा समावेश आहे.
